आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदेड : बसवेश्वर पुतळ्याच्या मागणीसाठी निघालेल्या मोर्चाला हिंसक वळण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाठीमारात जखमी कार्यकर्त्याला तिघांनी आधार दिला.छाया : करणसिंह बैस - Divya Marathi
लाठीमारात जखमी कार्यकर्त्याला तिघांनी आधार दिला.छाया : करणसिंह बैस
नांदेड - कौठा येथे नियोजित जागीच महात्मा बसवेश्वराचा पुतळा बसवावा, या मागणीसाठी निघालेल्या मोर्चाला गालबोट लागले. मनपोसमोर मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. त्यात १२ जण जखमी झाले. ५-६ पोलिस कर्मचारीही जखमी झाले. आयुक्त निवेदन घेण्यास न आल्याने तणाव निर्माण होऊन अखेर लाठीमार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

कौठा येथील नियोजित जागेवर पुतळा बसवावा, या मागणीसाठी बसवेश्वर पुतळा कृती समितीच्या वतीने सोमवारी मनपावर मोर्चा निघाला. ५ हजार लोक त्यात होते. नेतृत्व प्रकाश कौडगे यांनी केले. दुपारी दीड वाजता मोर्चा मनपोसमोर आला. बिचकुंदा येथील श्री मन्मथ स्वामी महाराज यांचेही तेथे आगमन झाले. आमदार हेमंत पाटील, डॉ. तुषार राठोड, प्रताप पाटील चिखलीकर, सुभाष साबणे, भास्करराव पा. खतगावकर, ओमप्रकाश पोकर्णा, गंगाधरराव पटने आदी मोर्चात होते. मोर्चाने प्रारंभापासून संयत भूमिका घेतली. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी नियोजित जागीच पुतळा व्हावा, अशी मागणी केली. आयुक्त सुशील खोडवेकर यांनी मोर्चाच्या स्थळी येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी अॅड. अविनाश भोसीकर, प्रकाश कौडगे, शिवलिंग शिवाचार्य महाराजांनी केली. दोन तास मोर्चेकरी आयुक्तांची वाट पाहत होते. त्यानंतर मोर्चेकरी संतापले अाणि त्यांनी दगड भिरकवल्याने हा प्रकार घडला.

आयुक्त आले नाही ; गाढवाला दिले निवेदन
शिवलिंग शिवाचार्य महाराज स्वत: उपस्थित असल्याने काहीही अनुचित होणार नाही, असे पोलिस, राजकीय नेते, नगरसेवकांनी आयुक्तांना सांगितले; परंतु ते आले नाही. त्यामुळे मोर्चेकरी संतप्त झाले. त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अखेर आयुक्त न आल्याने गाढवाला निवेदन देऊन मोर्चेकरी परतले.

दगड भिरकावल्याने झाला लाठीमार
मोर्चा झाल्यानंतर शिवलिंग शिवाचार्य महाराज, आमदार निघून गेल्यानंतर मोर्चातील काही तरुणांनी झेंड्याच्या काठ्या, पाणी पाऊच, दगड महापालिकेच्या दिशेने भिरकावले. त्यानंतर पोलिसांनी लाठीमार सुरू केला. सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमाराला ही घटना घडली.

मोर्चा महापौरांच्या विरोधात
आंदोलन महापौरांच्या विरोधात होते. त्यामुळे निवेदन महापौरांनी स्वीकारणे अपेक्षित होते. महापौर काही कामामुळे नव्हत्या. महापौर, उपमहापौरही नसल्यास आयुक्तांनी निवेदन रिसीव्ह करायला हवे. तेही दालनातच. जागेवर जाऊन आयुक्तांनी निवेदन घ्यावे हे प्रोटोकाॅलमध्ये नाही. निवेदन घ्यायला मी तयार होतो. ते निवेदन द्यायला आले असते तर घेतले असते. सुशीलकुमार खोडवेकर, आयुक्त, मनपा, नांदेड

जमाव पांगवण्यासाठी लाठीमार
मोर्चा शांततेत सुरू होता. मोर्चा झाल्यानंतर काही लोकांनी दगडफेक केली. काही दगड नागरिकांना लागले. ६ पोलिस कर्मचारीही जखमी झाले.जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला. मोर्चेकऱ्यांनी रेल्वेस्टेशन व बाफना चौकात दोन बसेसवरही दगडफेक केली. उद्याचा नांदेड बंद त्यांनी शांततेत करावा. - परमजितसिंह दहिया, पोलिस अधीक्षक, नांदेड