आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nanded News In Marathi, Congress, Bhaskarrao Khatgaonkar

नांदेडमधली काँग्रेस उमेदवाराबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - विद्यमान खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी रिंगणातून माघार घेतल्यानंतरही अद्याप काँग्रेसचा उमेदवार जाहीर झालेला नाही. या मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळते याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.


नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. शतप्रतिशत काँग्रेसमय असणारा हा एकमात्र जिल्हा आहे. त्यामुळे काँग्रेसची उमेदवारी ही विजयाची किल्ली मानली जाते. विद्यमान खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी सुरुवातीला उमेदवारीसाठी प्रयत्न करून अखेर निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. त्यानंतर आता उमेदवारीच्या स्पर्धेत केवळ माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांचीच नावे स्पर्धेत आहेत. अशोक चव्हाण हे तर काँग्रेसच्या प्रचारालाही लागले आहेत. तथापि काँग्रेसची उमेदवारी नक्की कोणाला? याबाबत मात्र अजूनही संभ्रम आहे. शनिवारी याबाबत अशोक चव्हाण यांना विचारले असता, आम्ही तर नांदेडमध्येच प्रचार करीत आहोत. उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत खरंच मला काहीही कल्पना नाही. पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतात, त्याला निवडून आणणे हे आमचे काम आहे. राजकीय वर्तुळात मात्र उमेदवारीवरून उलटसुलट चर्चा सुरू आहे. आदर्श प्रकरणामुळे अशोक चव्हाणांना उमेदवारी दिली तर विरोधक काँग्रेसला टीकेचे लक्ष्य करतील, अशी धास्ती पक्षश्रेष्ठींना वाटते. त्यामुळेच उमेदवार निश्चित होण्यास विलंब होत असल्याची चर्चा आहे.


दोन उमेदवारी अर्ज दाखल
लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नाही. शनिवारी 12 जणांना 28 उमेदवारी अर्ज देण्यात आले. शनिवारी भाजपचे उमेदवार डी. बी. पाटील यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला. या मतदारसंघात आतापर्यंत 96 इच्छुकांनी 211 उमेदवारी अर्ज नेले आहेत. त्यापैकी केवळ 2 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्यात इंडियन युनियन मुस्लिम लीग व बमुपा या पक्षांच्या दोन उमेदवारांचा समावेश आहे.