आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादळी पाऊस व गारपिटीचे सत्र सुरूच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - जिल्ह्यात 23 फेब्रुवारीपासून सुरू झालेला वादळी पाऊस व गारपिटीचे सत्र गुरुवारीही सुरूच राहिले. जिल्ह्यातील लोहा व कंधार या दोन तालुक्यांना सायंकाळी वादळी पाऊस व गारपिटीने झोडपले. कंधार व आजूबाजूच्या परिसरात बोराएवढ्या आकाराच्या गारा पडल्या.


मानसपुरी, बहादरपुरा, घोडज, पानभोसी, चिकलभोसी, नवरंगपुरा, बाभूळगाव, जंगमवाडी, कोटबाजार, कळका या गावांतही मुसळधार पाऊस व गारा पडल्या. साडेचार वाजेपर्यंत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले.


घोडज मार्गावर वाहतूक बंद : कंधार तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने घोडज मार्गावर झाड कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. मुसळधार पावसामुळे या मार्गावर असलेला छोटा नालाही दुथडी भरून वाहत आहे. गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका गहू, हरभरा या पिकांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे.


भोकरदन तालुक्यात गारपीट
गुरुवारी सायंकाळी 6.45 वाजता भोकरदन शहरात विजांच्या कडकडाटांसह जोरदार पाऊस आणि हलक्या स्वरूपाच्या गारा पडल्या. आलापूर, प्रल्हादपूर, पेरजापूर, वाकडी, आन्वा, मलकापूर, दानापूर आदी गावांमध्ये पाऊस आणि गारा पडल्या. यापूर्वीच्या गारपिटीने जिल्ह्यातील 33 हजार 343 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झालेले आहे.


मुलगा गंभीर
कंधार तालुक्यात झालेल्या गारपिटीत संगमवाडी येथील अमोल अशोक घुगे (7) हा बालक जखमी झाला. गारांचा मारा त्याच्या डोक्याला बसल्याने त्याला पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.