आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nanded News In Marathi, Water Shortage, Divya Marathi

पाऊस आल्यानंतरही नांदेडमध्‍ये पाणीटंचाई मात्र अद्याप कायम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - जिल्ह्यात 9 जुलैपासून आगमन झालेल्या पावसाने शेतक-यांना काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी पाणीटंचाई मात्र अद्याप कायम आहे. विष्णुपुरी जलाशयातील साठ्यात घट झाल्यामुळे नांदेड शहराला आठवड्यातून तीन वेळाच पाणीपुरवठा होत आहे. दमदार आणि भिजपावसानंतरच पाणीप्रश्न सूटू शकतो. त्यामुळे सर्वसामान्यांसह शेतकरी वरुण राजाच्या प्रतीक्षेत आहेत.

दोन दिवस दडी मारल्यानंतर पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा दडी मारून मंगळवारी रात्री जिल्ह्याच्या काही भागात हजेरी लावली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी जवळपास 75 मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने शेतक-यांना काही प्रमाणात दिलासा दिला.
पाणीटंचाईची समस्या मात्र या पावसाने कमी केली नाही. या उलट पावसाअभावी ही समस्या दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.

शहराला पाणीपुरवठा करणा-या विष्णुपुरी जलाशयात गेल्या आठवड्यात 5.60 दलघमी पाणीसाठा होता. त्यात घट होऊन बुधवारी हा जलसाठा 4.68 दलघमी झाला आहे.
शहराला संपूर्ण उन्हाळ्यात एक दिवसाआड पाणीपुरवठा होता. सन 2007 मध्ये विष्णुपुरीच्या जलसाठ्यात विक्रमी घट झाली होती. मृत साठ्यातून शहराला पाणीपुरवठा करण्यात येत होता. त्यानंतर 2010 मध्ये जलाशयातील पाणीसाठा 2 दलघमीपर्यंत कमी झाला. त्यानंतर दोन वर्षे चांगला पाऊस झाल्याने विष्णुपुरीतील जलसाठा समाधानकारक राहिला. या वर्षी विष्णुपुरीतील साठा झपाट्याने कमी होत आहे.

दिग्रस बंधा-याच्या पाण्यावर मदार
शहरातील पाणीटंचाईची तीव्र समस्या लक्षात घेऊन पाणीपुरवठ्यासाठी दिग्रस बंधा-यातून 15 दलघमी पाणी सोडण्याची मागणी जिल्हा प्रशासनातर्फे परभणी जिल्हाधिका-यांना करण्यात आली. सोमवारीच या संबंधात पत्रव्यवहार झाला आहे. त्यामुळे दिग्रस बंधा-यात नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी राखीव असलेले पाणी लवकरच सोडले जाण्याची शक्यता असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी पी. पी. कुलकर्णी यांनी सांगितले.

महिन्याला 3 दलघमी पाणी
नांदेड शहराला दररोज 0.09, तर महिन्याला 3 दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. सध्या विष्णुपुरी जलाशयात 4.68 दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. यातील केवळ 2 दलघमी पाणीसाठा पुरवठ्यासाठी कामी येऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या पाणीसाठ्याची स्थिती पाहता हा पाणी केवळ 15 दिवस पुरेल एवढाच आहे.

टंचाईमुळे पाणीकपातीचा निर्णय
सोमवारपासून शहरात आठवड्यातून तीन दिवस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. टंचाईची स्थिती लक्षात घेता आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला, तरी सध्याचा पाणीसाठा अजून महिनाभर पुरू शकतो.

मृतसाठाही कामी येणार नाही
मृतसाठा हा जलाशयाच्या तळाला असतो. तिथपर्यंत पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइन टाकलेल्या नसतात. मोटारी तिथपर्यंत बसवल्या, तर पावसाळ्यात गाळात रुतून बसतात. शिवाय ही खर्चिक बाबही असते. सन 2007 मध्ये विष्णुपुरी जलाशयातील मृतसाठ्यातून पाणी घेण्याची वेळ आली तेव्हा अडीच कोटी रुपये खर्च करून पाइपलाइन टाकण्यात आली होती. ती अद्यापही असल्यामुळे या वर्षी आतापर्यंत जलाशयातून पाणीपुरवठा होऊ शकला. ती पाइपलाइन नसती, तर जून महिन्यातच शहराला पाणीटंचाईच्या झळा बसल्या असत्या, असे उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांनी सांगितले.