आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळात रोहयो कामे बंद, मजुरांना काम नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - लोहा-कंधार तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती असतानाही दोन्ही तालुक्यांत रोहयोची कामे बंद आहेत. मजुरांच्या हाताला ऐन दुष्काळात काम नसल्याने मजुरावर उपासमारीची वेळ आली असल्याचा आरोप मजविपचे माजी अध्यक्ष व माजी खासदार डाॅ. व्यंकटेश काब्दे यांनी केला.
काब्दे यांनी रविवारी दोन्ही तालुक्यांचा दौरा केला. दौऱ्याची सविस्तर माहिती त्यांनी सोमवारी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली. मराठवाडा जनता विकास परिषद व परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. लोहा-कंधार तालुक्यातील किवळा, लोंढेसांगवी, उस्माननगर, शिराढोण, उमरा, गोळेगाव, हिंदोळा, कापसी व आष्टूर या गावांना भेटी दिल्या. जवळ जवळ सर्वच गावांत पाण्याची तीव्र टंचाई आहे. प्रशासनाने ग्रामपंचायतसमोर मागेल त्याला काम असे ठळक अक्षरात लिहिले. प्रत्यक्षात गावातील लोकांनी कामाची मागणी करूनही त्यांना काम मिळत नाही. शासकीय यंत्रणांच्या आॅनलाइन प्रणालीमध्ये नोंदणी करणे अवघड जात आहे. पूर्वी मनरेगात केलेल्या कामाचा मोबदला वेळेवर मिळाला नाही. त्यामुळे नवीन कामावर जाण्यास मजूर तयार नाहीत, असेही दिसून आल्याचे माजी खासदार डाॅ. काब्दे यांनी म्हटले आहे.
पाणी विकत घ्यावे लागते
शिराढोण हे गाव पाण्याच्या बाबतीत शापित गाव आहे. गावात बाराही महिने पाणी विकत घ्यावे लागते. या गावात ३५ रुपयांना एक पिंप तर ३ रुपयांना एक घागर पाणी विकत घ्यावे लागते. शौचालयाला जायचे असेल तर किमान दीड रुपयाचे पाणी लागते. लोकसभा मतदारसंघात हा भाग लातूरमध्ये येत असल्याने नांदेडचे खासदार, आमदार या भागाकडे फारसे लक्ष देत नसल्याचा आरोपही डाॅ. काब्दे यांनी केला. बहुतांश गावांत भारनियमन आहे. ४-५ तासच वीज राहते. यामुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय आहे. शेतकऱ्यांनी पीक विमा भरला, पण काही गावांत अद्याप विम्याची रक्कम मिळाली नाही. कापसी, हिंदोळा या गावात कमी प्रमाणात विमा मिळाला आहे. याबाबत प्रशासन व लोक प्रतिनिधींना तक्रारी सादर करणार असल्याचेही डाॅ. काब्दे यांनी म्हटले आहे. डाॅ. काब्दे यांच्यासोबत परिवर्तन प्रतिष्ठानचे प्रा. लक्ष्मण शिंदे, गणेश पाटील, शेतकरी संघटनेचे नेते बळवंत मोरे, रंगनाथ भुजबळ, मजविपचे सचिव प्रा. विकास सुकाळे, भगीरथप्रसाद शुक्ला हेही पाहणी दौऱ्यात होते.
बातम्या आणखी आहेत...