आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होस्टेलवरून पडून विद्यार्थिनीचा गूढ मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - विष्णुपुरी येथील ग्रामीण तंत्रनिकेतनच्या आवारातील वसतिगृहाच्या तिसर्‍या मजल्यावरून पडल्याने जयश्री चंदनकर या विद्यार्थिनीचा शनिवारी पहाटे 3 वाजता संशयास्पद मृत्यू झाला. बिलोली तालुक्यातील हज्जापूर येथील जयश्री चंदनकर (20) ही तंत्रनिकेतनमध्ये तिसर्‍या वर्षाची (कॉम्प्युटर) विद्यार्थिनी होती.
जयश्रीला तीन दिवसांपासून उलट्या व डायरियाचा त्रास सुरू होता. त्यामुळे ती अशक्त झाली. पहाटे तीनच्या सुमाराला ती वसतिगृहाच्या तिसर्‍या मजल्यावरून खाली पडली. प्राचार्य विजय पवार व अन्य कर्मचार्‍यांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
प्राचार्यासह संचालकांवर गुन्हा
जयश्रीचे वडील दुर्गादास मारोतराव चंदनकर यांच्या तक्रारीवरून नांदेड ग्रामीण पोलिस ठाण्यात तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य विजय पवार, व्यवस्थापक मंडळाचे सर्व संचालक,
संस्था सचिव, कर्मचारी, अधिकारी, होस्टेल अधीक्षिका बोराडे यांच्या विरोधात 304 (अ) कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
वसतिगृहातील मुलींवर देखरेख करण्यासाठी अधीक्षिका बोराडे आहेत. विशेष म्हणजे
त्यांना या घटनेची माहिती दिवस उजाडेपर्यत नव्हती. त्यांना माहिती दिली नाही, असे प्राचार्य पवार
यांनीच सांगितले. त्यामुळे या प्रकरणातील संशय बळावला आहे.
या प्रकरणी संस्थाचालक, प्राचार्याविरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी जयश्रीचे पालक, शिवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष वैजनाथ टोनसुरे दिवसभर ग्रामीण पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. जयश्रीचे शवविच्छेदन गुन्हा दाखल झाल्याशिवाय करायचे नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला होता. या प्रकरणातील सर्वच हालचाली, पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत सीआयडीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे यांनी गृहमंत्री आर.आर.पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जयश्रीचा घातपात
जयश्री अत्यंत हुशार विद्यार्थिनी होती. सन 2010 पासून ती तंत्रनिकेतनमध्ये शिकत होती. बुधवारीच मी तिला भेटून गेलो. तेव्हा तिची प्रकृती उत्तम होती. ती कोणत्याही ताणतणावात नव्हती. त्यामुळे तिचा अशा पद्धतीने मृत्यू व्हावा, हे संशयास्पद आहे. तिच्या मृत्यूमागे कॉलेज प्रशासनाचा हलगर्जीपणा अथवा घातपात असावा. या प्रकरणी कॉलेजमधील सर्व कर्मचार्‍यांची कसून चौकशी व्हावी.
दुर्गादास चंदनकर, जयश्रीचे वडील

तोल जाऊन पडली असावी
तंत्रनिकेतनच्या आवारात मुलींचे वसतिगृह आहे. त्या वसतिगृहात 40 मुली आहेत. जयश्री दोन दिवसांपासून आजारी होती. अशक्तपणामुळेच तोल जाऊन ती पडली असावी. पहाटे 4.17 वाजता मला वसतिगृहातून कर्मचार्‍याचा फोन आला. प्रथम मुलीला शासकीय रुग्णालयात आणले. तिथे ती मृत असल्याचे समजले. 5 वाजता तिच्या पालकांना फोनवर ही घटना कळवली. यात घातपात अजिबात नाही.
विजय पवार, प्राचार्य, ग्रामीण तंत्रनिकेतन, विष्णुपुरी

सखोल चोकशी करू
प्राथमिक माहितीनुसार ती दोन दिवसांपासून आजारी होती. अशक्तपणामुळे तिचा तोल गेला असावा. त्यामुळे याबाबत निश्चित काही समजू शकले नाही. या प्रकरणाचा सखोल तपास करू.
विनीता साहू, सहायक पोलिस अधीक्षक, नांदेड