आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nanded Pwd Department Officer Case News In Divya Marathi

नांदेडमध्ये ‘बांधकाम’च्या मुख्य अभियंत्यावर फौजदारी खटला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - नांदेडातील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाच्या बांधकामासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घेतली नसल्याचा ठपका ठेवून औरंगाबादचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सी.पी. जोशी व कार्यकारी अभियंता व्ही.के. नवले यांच्यावर मंडळाने फौजदारी खटला दाखल केला आहे. नांदेडच्या विष्णुपुरी भागात राज्य सरकारने हे रुग्णालय उभारले असून, नांदेडच्या मुख्य न्याय दंडाधिकार्‍यांकडे हा खटला दाखल करण्यात आला आहे.

नांदेडच्या विष्णुपुरी भागात माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या नावाने शासनानेच भव्य रुग्णालय बांधले. वीस हजार चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवरील या रुग्णालयाचे अद्याप उद्घाटन झालेले नाही. प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रधान सचिव आर. राजीव यांनी ही कारवाई केली.

काय आहे नियम : -20 हजार चौरस फुटापेक्षा जास्त जागेत बांधकाम करताना प्रदूषण नियंत्रण कायदा कलम 18/1(ब)नुसार परवानगी घेणे बंधनकारक आहे. परंतु शंकरराव चव्हाण रुग्णालयाच्या बांधकामावेळी मंडळाची परवानगी घेतली गेली नाही.

बांधकाम झाल्यावर केला अर्ज
1. रुग्णालयाचे बांधकाम मे 2014मध्ये पूर्ण झाले. त्यानंतर मुख्य अभियंत्यांनी मंडळाच्या औरंगाबादेतील प्रादेशिक अधिकार्‍यांकडे परवानगीसाठी अर्ज केला.
2. बांधकामाआधी परवानागी घेणे आवश्यक असल्याने या अर्जावर आक्षेप घेण्यात आला. ही फाईल प्रधान सचिवांकडे पाठवण्यात आली. जोशी व नवले यांची सुनावणीही झाली.
3. दोन्ही अधिकार्‍यांना समाधानकारक उत्तरे न देता आल्याने प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या प्रधान सचिवांनी दोघांवर फौजदारी खटला (आरसीसी नं.582 फौजदारी तक्रार) दाखल करण्याचे आदेश दिले.
4. नांदेडच्या मुख्य न्यादंडाधिकार्‍याच्या न्यायालयात 2 ऑगस्ट रोेजी दाखल करण्यात आल्याची माहिती मंडळातील विश्वसनील सुत्रांनी दिली.

26 ऑगस्टला सुनावणी
आम्ही मंडळाकडे अर्ज केला आहे. ही तक्रार म्हणजे एक औपचारिकता असून, 26 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. त्यानंतर कदाचित तक्रार मागेही घेतली जाईल. सी.पी. जोशी, मुख्य अभियंता, सा.बां. विभाग