आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नांदूर-मधमेश्वरच्या पाण्यासाठी मोर्चा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गंगापूर- गंगापूर तालुक्यासाठी नांदूर मधमेश्वरचे सोडलेले पाणी राजकीय दबावामुळे बंद केल्याच्या निषेधार्थ गंगापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकार्‍यांनी शनिवार, 18 रोजी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचे ठरवले आहे.
यासंबंधी शुक्रवारी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. तालुक्यात सर्वात कमी पाऊस झाल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना चारा व सर्वसामान्य जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर व संवेदनशील झाला आहे. अत्यल्प पावसामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली असून त्यामुळे यंदाचे खरिपाचे पीक हातातून गेल्यासारखी स्थिती आहे.
नांदूर-मधमेश्वर कालव्याचे ओव्हरफ्लोचे पाणी 2 ऑगस्टपासून गंगापूर, वैजापूरसाठी सोडण्यात आले आहे. मात्र वैजापूर तालुक्यातील राजकीय पुढार्‍यांनी दाबाव टाकून ते पाणी गंगापूरपर्यंत येऊ दिले नाही. त्यामुळे हे पाणी मिळावे, अशी मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या- कालव्यातून पाणी सोडल्यानंतर वैजापूर तालुक्यातील संपूर्ण गेट पोलिस बंदोबस्तात, राज्य राखीव दलामार्फत बंद करून ते गंगापूर तालुक्यात सोडावे, पाणी सोडताना टेल टू हेड पद्धतीचा वापर करून लाभक्षेत्राच्या शेवटच्या टोकापासून सर्व पाझर तलाव, गावतळी, कोल्हापुरी बंधारे पूर्ण भरल्याशिवाय बंद करू नये, परस्पर पाणी फोडून गंगापूर तालुक्यातील शेतकर्‍यांवर अन्याय करणार्‍या वैजापूर तालुक्यातील मंडळींवर पोलिस केसेस दाखल करून त्यांना कालवा परिसरात येण्यासाठी बंदी घालावी, अशा मागण्या गंगापूर येथील सर्वपक्षीय नेत्यांनी केल्या आहेत. मागण्या मान्य करण्यासाठी 14 ऑगस्ट रोजी किरण डोणगावकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांना नांदूर मधमेश्वरच्या कार्यकारी अभियंत्यांना जिल्हाधिकार्‍यांसमक्ष लेखी निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.
त्यामुळे या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील शेतकरी व सर्वपक्षीय पदाधिकारी शनिवारी सकाळी अकरा वाजता शिवाजी चौक ते तहसील कार्यालयादरम्यान जाहीर मोर्चा काढणार आहेत. मोर्चात तालुक्यातील सर्व शेतकरी व नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन काँग्रेसचे नेते किरण पाटील डोणगावकर, राष्ट्रवादीचे वाल्मीक शिरसाठ, माजी जि.प. सदस्य अँड. नंदकुमार तारू, काँग्रेसचे तालुध्यक्ष विजय मनाळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिश्चंद्र डव्हाण यांनी केले आहे.