वैजापूर - नांदूर - मधमेश्वर कालव्यातून पिण्यासाठी कार्यकारी अभियंत्याने दिलेले लेखी आश्वासन फोल ठरले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकर्यांनी खोटे आश्वासन देणार्या कार्यकारी अभियंत्यावर फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्याची तक्रार पोलिस प्रशासनाकडे केली आहे. त्यानंतर नांदूर-मधमेश्वर प्रकल्प कार्यालयासमोर सुमारे तासभर धरणे आंदोलन केले.
या वेळी पाणी न मिळाल्यामुळे संतप्त शेतकर्यांचा नांमका कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न पोलिसांनी अटकाव करून रोखला. पाणी देण्याची कारवाई न झाल्यामुळे कार्यकारी अभियंत्यासह वरिष्ठ अधिकारी आज मारहाण होईल या धास्तीने कार्यालयाकडे फिरकलेच नाहीत. शेतकर्यांकडून कायदा-सुव्यवस्था हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने कार्यालय परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
पिण्यासाठी पाणी न मिळाल्यास सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा चार गावांतील ५० शेतकर्यांनी काही दिवसांपूर्वी नांमका विभागाला दिला होता. या मागणीवर गुरुवारी नांमका प्रशासनाने शेतकर्यांना तीन दिवसांत पाणी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते.
मात्र नाशिक पाटबंधारे विभागाने कालवा बंद केल्याने नांमकाचे पाणी देण्याचे आश्वासन फोल ठरले. चिडलेल्या शेतकर्यांनी अधिकार्यांना जाब विचारण्यासाठी नांमका कार्यालय गाठले. पण अधिकारी गायब झालेले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे शेतकर्यांनी धरणे आंदोलन सुरू केले. खोटे आश्वासन देणार्या कार्यकारी अभियंता फुलंब्रीकर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बंदोबस्तावर तैनात पोलिसांकडे शेतकर्यांनी लावून धरली होती.
शेतकर्यांची थट्टा
नांदूर - मधमेश्वर जलद कालव्यातून वैजापूर व गंगापूरला पिण्यासाठी ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आले. परंतु पाणी मिळत नसल्याची तक्रार लाडगाव, नांदूरढोक, बाभूळगावगंगा, सावखेडगंगा येथील ५० शेतकर्यांनी नांमका विभागाकडे केली. तरीदेखील पाणी देण्यासाठी टाळाटाळ होत असल्याने संतप्त झालेल्या शेतकर्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्यानंतर तीन दिवसांत पाणी देण्याची कारवाई करण्याचे लेखी पत्र देऊन शेतकर्यांची थट्टा केली आहे, असा आरोप शेतकरी धनंजय धोर्डे , बाबासाहेब थेटे, शिवाजी थेटे , अनिल गाढे, विनायक गाढे, गोकुळ कुंजीर, गंगाधर गाढे, भिका घंगाळे, योगेश घोडे आदींनी केला आहे.
काय होते आश्वासन
नांमका कालव्यात ३ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत पाणी सोडण्यात आले होते. मात्र नांमका प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे लाभक्षेत्रातील गावांना पाणी न मिळाल्याची ओरड होत होती. त्यामुळे ४ गावांतील शेतकर्यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. परिणामी कार्यकारी अभियंत्यांनी लाभक्षेत्रातील शेतकर्यांना पाण्याचा लाभ देण्यासाठी कालव्यातील पाणी आवर्तनाचा कार्यक्रम (१० सप्टेंबर ) पाच दिवसांपर्यंत वाढवण्याचा मागणी प्रस्ताव नाशिक पाटबंधारे विभागाला बिनतारी संदेश वाहक यंत्राद्वारे सादर केला होता. या मागणीला नाशिक विभागाने केराची टोपली दाखवली. नांमका प्रशासनाने दिलेले आश्वासन हवेत बारगळले.