आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरपंचाचा मृतदेह जालना जिल्हाधिकारी कार्यालयात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना/बदनापूर - तालुक्यातील नाणेगाव येथील सरपंच मनोज कसाब यांच्यावर 3 एप्रिल रोजी माजी सरपंचासह त्याच्या सहकार्‍यांनी प्राणघातक हल्ला केला होता. उपचारादरम्यान जालना येथील खासगी रुग्णालयात मनोज कसाबचा सोमवारी मृत्यू झाला. याप्रकरणी दोषींना अटक करून कडक शिक्षा व्हावी, या मागणीसाठी मृताच्या नातेवाइकांनी मंगळवारी मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात आणला.
सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी मंगळवारी दुपारी 1 वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात मृतदेह नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, याठिकाणी पोलिस बंदोबस्त असल्यामुळे अँम्ब्युलन्स जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणली. या वेळी नातलगांनी प्रचंड आक्रोश केला. सर्व आरोपींना अटक करून शिक्षा करावी, अशी मागणी मृताचा भाऊ संदीप कसाब याने केली. या वेळी तासभर रास्ता रोकोही करण्यात आला. यामुळे अंबड चौफुली ते पोलिस अधीक्षक कार्यालयापर्यंत वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच तत्काळ पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी घटनास्थळी येऊन आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिले. तसेच आपण स्वत: गावात येत असल्याचे सांगितले. त्यानंतर जमाव शांत झाला व त्यांनी मृतदेह नाणेगावला नेला.
50 जणांवर गुन्हे
सरपंच मनोज कसाब यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात आणून जमाबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 45-50 जणांविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक गजानन जायभाये यांनी फिर्याद दिली.
गावातील राजकारणामुळे मारहाण
ग्रा.प.चे राजकारण व अंगणवाडी बांधकामावरून 3 एप्रिल रोजी मनोज कसाब यांना रात्री धोपटेश्वर फाट्याजवळ 10-11 जणांनी मारहाण केली होती. याप्रकरणी गणेश चव्हाण (माजी सरपंच), बाबूराव चव्हाण, उमेश चव्हाण, किशोर चव्हाण, संतोष शिंदे, परमेश्वर चव्हाण, तुकाराम चव्हाण, बद्री चव्हाण, कृष्णा चव्हाण, बळीराम चव्हाण (सर्व रा. नानेगाव) यांच्यावर बदनापूर पोलिसात गुन्हा दाखल झाला.

सरपंच मनोज कसाब यांचा मृतदेह जिल्हधिकारी कार्यालयात आणला त्यावेळी तेथे गर्दी झाली होती.