आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेस, आठवड्यात दुसऱ्यांदा, चार वर्षांत १४० वेळा इंजिन बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना : इंजिन बंद पडल्याने तपोवन एक्स्प्रेस तीन तास खोळंबल्याचा प्रकार आठ दिवसांपूर्वी घडला होता. हा प्रकार ताजा असतानाच शनिवारी पुन्हा नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेस चे इंजिन सातोना स्थानकाजवळ बंद पडले. त्यामुळे ही गाडी तब्ब्ल अडीच तास उशिरा जालना स्थानकावर पोहोचली.
दक्षिण मध्य रेल्वेच्या वतीने नांदेड विभागास सातत्याने जुने इंजिन दिले जात असल्याने इंजिन बंद पडून रेल्वे खोळंबण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. गेल्या चार वर्षात या मार्गावर तब्बल १४० वेळा रेल्वे इंजिन बंद पडण्याचे प्रकार घडले आहेत.

नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेस ही रेल्वे पहाटे पाच वाजता परभणी स्थानकावरून निघाली. त्यानंतर सकाळी ६.१५ वाजता सातोना येथे या रेल्वेचे इंजिन बंद पडले. त्यामुळे ही रेल्वे सातोना स्थानकावरच खोळंबली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी याची माहिती नांदेड विभागीय कार्यालयास तसेच जालना येथे कळवली.
दरम्यान, कोडी स्थानकावर मालगाडी उभी होती. त्या मालगाडीचे इंजिन नरसापूर -नगरसोल एक्स्प्रेसला बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. यात मोठा वेळ गेल्याने प्रवाशांना सातोना येथेच थांबून राहावे लागले.
याच वेळी परभणीकडून येणारी मराठवाडा एक्स्प्रेस सातोना स्थानकावर थांबवण्यात आली. या रेल्वेतून काही प्रवाशांनी पुढचा प्रवास केला. आठ वाजेच्या सुमारास कोडी येथून मालगाडीचे इंजिन सातोना येथे आणण्यात आले त्यानंतर ही गाडी पुढे रवाना करण्यात आली.
नरसापूर एक्स्प्रेस सकाळी ७ वाजता जालना स्थानकावर येते. शनिवारी ती ९.३० वाजता पोहोचली. सातोना स्थानकारच ही गाडी बंद पडल्याने इतर गाड्यांवर त्याचा परिणाम झाला नाही. परंतु प्रवासी अडीच तास खोळंबले.
बातम्या आणखी आहेत...