आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाभोलकर हत्याकांडाचा एसआयटी तपास करा - मुक्ता दाभोलकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रणेते नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला सहा महिने उलटले तरी मारेकर्‍यांचा तपास लागत नाही, ही खेदाची बाब आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात पोलिस प्रशासनावर ताण येईल. त्यामुळे याकडे दुर्लक्ष होऊ शकते. म्हणून न्यायालयाच्या मार्गदश्रनाखाली विशेष चौकशी समिती (एसआयटी) नेमण्याची मागणी आम्ही करणार आहोत, असे दाभोलकरांच्या कन्या व अंनिस कार्यकर्त्या मुक्ता यांनी सांगितले.

ग्रंथ महोत्सवाच्या निमित्ताने रविवारी येथे आलेल्या मुक्ता म्हणाल्या, जादूटोणा कायदा झाल्यापासून राज्यात 40 गुन्हे दाखल झाले आहेत. कायदा राबवण्यासाठी समितीची चळवळ सक्रिय असल्याची पोचपावतीच यातून मिळाली. शासनाच्या 14 विभागांच्या माध्यमातून कायद्याचा प्रचार व प्रसार केला जाऊ शकतो. ग्रामसभेच्या माध्यमातून गावोगाव माहिती दिली जावी, अशीही समितीची मागणी आहे.

पद्मश्री स्वीकारणार : मारेकरी पकडेपर्यंत पद्मश्री स्वीकारू नये, असे मत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केले होते. त्यांचा विचार आम्ही समजू शकतो. परंतु, दुसरीकडे पद्मश्री घेतला पाहिजे; कारण, ती सामाजिक कार्याची समाजाने दिलेली पावती आहे. अनेक कार्यकर्त्यांचे हेच मत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच पद्मश्री स्वीकारण्याचा निर्णय घेतल्याचे मुक्ता यांनी सांगितले.