आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narendra Modi News In Marathi, BJP, Nanded Rally, Lok Sabha Election

देशात भाजपचे मजबूत सरकार आणा,नरेंद्र मोदींची तोफ धडाडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - महिला व मुलींच्या संरक्षणासाठी एक हजार कोटी मागच्या बजेटमध्ये जाहीर केले. कुठल्याच निर्भयाला छदामही न देणारे काँग्रेस आघाडी सरकार महिलांचे-मुलींचे काय संरक्षण करू शकणार, असा प्रश्न उपस्थित करीत महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी रोखण्याबरोबरच महिलांचे संरक्षण करण्यासाठी दिल्लीत भाजपचे मजबूत सरकार आणा, असे आवाहन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी नांदेडच्या विराट सभेत केले.


मराठवाड्यातील लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ गुरुगोविंदसिंग स्टेडियमवर रविवारी भरदुपारी रखरखत्या उन्हात मोदींच्या भारत विजय रॅलीचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी मोदी बोलत होते. ते म्हणाले, देशात सध्या आपण महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी रोखण्याची भाषा करीत असताना काँग्रेस मात्र मोदी रोकोचा नारा देत आहे. यावरून देशात आलेले परिवर्तनाचे तुफान सुनामीत रूपांतरित होणार आहे, हे येथे तळपत्या उन्हात जमलेल्या मानवसागराच्या तपस्येतून दिसून येत आहे. देशाला लुटणारे या मानवसागराच्या सुनामीतून सुटणार नाहीत. लोकसभेची ही निवडणूक केवळ भाजप वा मित्रपक्षांची नाही तर ती जनता जनार्दनाची आहे. देशात पहिल्यांदाच ही वेळ आली असल्याने काँग्रेसची झोप उडाली असून 16 मेनंतर त्यांची जागा कुठे असेल, हेही त्यांना कळून चुकले आहे, असे मोदी म्हणाले.


या वेळी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार रामदास आठवले, शिवसेनेचे सुहास सामंत, उमेदवार चंद्रकांत खैरे (औरंगाबाद), आमदार संजय जाधव (परभणी), खासदार रावसाहेब दानवे (जालना), डी.बी.पाटील (नांदेड), सुभाष वानखेडे (हिंगोली) यांच्यासह अ‍ॅड.विजय गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर आदी उपस्थित होते.


सभेला दीड लाख लोकांची उपस्थिती?
०कडक उन्हात मोदींच्या सभेला दीड लाख लोक उपस्थित असल्याचा दावा भाजप नेते व सभेचे संचालनकर्ते चैतन्यबापू देशमुख यांनी केला.
०श्री गुरुगोविंदसिंघजी स्टेडियमच्या प्रेक्षक गॅलरीची क्षमता 35 हजार आहे. मैदानात संरक्षक कठडे अथवा खुर्ची न टाकता प्रेक्षक बसले तर एकूण क्षमता दीड लाखाच्या आसपास आहे.
०आयबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदींच्या सभेला जवळपास 75 हजार लोक उपस्थित असावेत.
०बंदोबस्तावरील पोलिसांच्या माहितीनुसार सभेला दोन लाखांच्या वर लोक उपस्थित होते.
क्षणचित्रे
०नांदेडचे तापमान रविवारी 40.6 सें. होते. एवढ्या कडक उन्हात मोदींचे भाषण ऐकण्यासाठी लहानापासून ते वृद्धापर्यंत लोक चार-पाच तास उन्हात बसून होते.
०खुद्द मोदींनीही याची दखल घेतली. आपल्या भाषणात ते म्हणाले, ही तुमची तपश्चर्या मी व्यर्थ जाऊ देणार नाही.
०कडक उन्हामुळे सभेला आलेल्या मीनाक्षी सोळंके (30, रा. लिंबगाव) व कुलदीप जाधव (15, रा. कृष्णूर) या दोघांना चक्कर आली. त्यांना सावलीत बसवून पाणी दिल्यानंतर ते स्वस्थ झाले.
०मोदी दुपारी 2.03 मिनिटांनी मंचावर आले. मोदी यांनी बरोबर 2 वाजून 19 मिनिटांनी भाषणाला सुरुवात केली. 2 वाजून 47 मिनिटांनी त्यांनी आपले भाषण संपवले.
०मोदींनी भाषणाची सुरुवात मराठीत केली. गुढीपाडव्याच्या शुभेच्छाही मराठीतून दिल्या.
०मराठवाड्यातील महायुतीच्या उमेदवारांनी मोदींचा 51 किलोचा हार घालून सत्कार केला. हा हार खास हैदराबाद येथून मागवण्यात आला.
०मोदींचे भाषण सुरू असताना लोकांनी अधूनमधून ‘मोदी... मोदी..’ चे नारे लावले.