आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरबारात येणार, सुरक्षेमुळे नरेंद्र मोदी कुलस्वामिनी तुळजाभवानीचे दर्शन नाही घेणार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी दुपारी तुळजापूर येथे प्रचारसभेसाठी येत आहेत. ते हेलिकॉप्टरने येणार असून भाषणानंतर नांदेड जिल्ह्यातील लोह्याकडे प्रयाण करतील. कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव ते कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी मंदिरात जाणार नाहीत, असे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेससह शिवसेना, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी तुळजापुरात सभा घेतल्यामुळे अखेरच्या टप्प्यात मोदींना तुळजापुरात सभा घ्यावी लागली. या सभेची तयारी आठ दिवसांपासून सुरू होती. अन्य राज्यांतून आलेल्या पोलिस अधिका-यांनी हेलिपॅडसह पंतप्रधान मोदींच्या सभेचे नियोजन आखून दिले. पंतप्रधान कार्यालयाच्या नियोजनाप्रमाणे मोदी यांच्या दौ-यामध्ये कमालीची शिस्त आहे. तुळजापूर शहरातील नळदुर्ग रोडलगत मोकळ्या मैदानावर होत असलेल्या सभेच्या ठिकाणापासून अवघ्या ५० मीटर अंतरावर हेलिपॅड असून, पंढरपूर येथील सभेनंतर हेलिकॉप्टरने मोदी यांचे १२.४५ वाजता आगमन होणार आहे. अंदाजे ४५ मिनिटांच्या भाषणानंतर ते लगेच हेलिकॉप्टरने लोहा येथील सभेसाठी रवाना होतील.
आशीर्वाद हवेत : स्वबळ आजमावताना भाजपने महाराष्ट्रात प्रचारासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव वापरले आहे. वास्तविक, शिवाजी महाराज तुळजाभवानी मातेला प्रेरणास्थानी मानत होते. तुळजाभवानीने आशीर्वाद दिल्यानंतर यश मिळते, अशी महाराजांची धारणा होती. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामिनीचे आशीर्वाद मागण्यासाठी पंतप्रधान मोदी तुळजापुरात येणार असले तरी मंदिरात दर्शनासाठी जाणार नाहीत.

३ पंतप्रधानांनी घेतले होते दर्शन
यापूर्वी वेगवेगळ्या निवडणुकांच्या माध्यमातून तुळजापुरात आलेल्या पंतप्रधानांनी मंदिरात जाऊन कुलस्वामिनीचे आवर्जून दर्शन घेतले होते. यामध्ये स्व. पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांचा समावेश होता. दरबारात येऊनही दर्शनाशिवाय परतणारे मोदी एकमेव पंतप्रधान असतील.