आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण : नरेंद्र मोदी बोलले.. काँग्रेस नेत्यांनी नाही ऐकले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - लातूर मतदारसंघात काँग्रेसने स्थानिक मुद्दय़ांना बगल देऊन केवळ मोदीविरोध हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा केला. ज्यांच्या नावाभोवती निवडणूक फिरत होती त्या मोदींची अखेर बुधवारी लातुरात सभा झाली. अपेक्षेप्रमाणे चाहत्यांनी प्रचंड गर्दीही केली. मात्र, जाहीर सभांमधून दररोज त्यांच्यावर टीका करणार्‍या काँग्रेस नेत्यांनी ना मोदींची सभा ऐकली, ना पाहिली.
दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित, धीरज, पत्नी वैशालीताई या सर्वच काँग्रेसजनांचे बुधवारचे प्रचाराचे नियोजन मोदींच्या सभेचे टायमिंग वगळून होते. अमित देशमुख सकाळी 10 वाजल्यापासून निलंगा तालुक्याच्या दौर्‍यावर होते. दोन वाजता बाभळगावला येण्याचे नियोजन केले होते. मात्र, त्यांना बाभळगावला पोहोचायलाच चार वाजले. वैशालीताई, धीरज यांच्या पहिल्या टप्प्यातील सभा दुपारीच संपल्या. सायंकाळच्या सभा सहानंतर होत्या. त्यामुळे मोदींची सभा सुरू असताना तिघेही बाभळगावच्या गढीवरच होते. विरोधकांच्या सभेत काय घडते याचे अपडेट सगळेच राजकारणी ठेवतात. मात्र खुद्द अमित यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना आपण मोदींची सभा लाइव्ह पाहिली नसल्याचे सांगितले. काही मुद्दय़ांवर मोदी बोलल्याचे ऐकले आहे. त्याची माहिती घेतोय, असे त्यांनी सांगितले. विलासरावांचे बंधू आमदार दिलीप देशमुख हेही विश्वजित कदम यांच्या प्रचारासाठी पुण्यात गेल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, आमदार वैजनाथ शिंदे आणि उमेदवार दत्तात्रय बनसोडे हेही प्रचारकार्यातच व्यग्र होते. प्रवासात असल्यामुळे बनसोडेंशी संपर्कही होऊ शकला नाही. तर व्यंकट बेद्रे यांनीही आपण प्रचार सभेत व्यस्त असल्यामुळे मोदींची सभा ऐकली नाही, असे सांगितले.
मुस्लिम वस्त्यांतही उत्सुकता
मोदींच्या सभेबाबत मुस्लिम समाजात उत्सुकता होती. काही मुस्लिम नागरिकांनी प्रत्यक्ष हजेरीही लावली. मात्र, बहुतेकांनी टीव्हीवरच भाषण ऐकले. त्यांच्या वस्त्यात बंदोबस्तही नव्हता. तेथील शुकशुकाटामागे जसे पावसाचेही कारण होते, तसे सभा पाहण्यासाठी गेलेल्या लोकांमुळे रस्त्यावर कमी गर्दीचेही होते.