आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नासाच्या पथकाकडून औंढा भागाची पुन्हा पाहणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - ब्रह्मांडातील गुरुत्वलहरींसह भूगर्भातील लहरींचा अभ्यास करण्यासाठी नासाच्या वतीने भारतात उभारण्यात येणाऱ्या ‘लिगो’ नावाच्या प्रयोगशाळेसाठी औंढा नागनाथ तालुक्यातील पठाराची पुन्हा बुधवारी तिसऱ्यांदा अमेरिकेच्या नासा व पुणे येथील आयुका संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पाहणी केली. अमेरिकेतील हान्सफोर्ड लिव्हिंगस्टन येथील दोन लिगो (लेझर इंटर फेरोमीटर ग्रॅव्हिटेशनल वेव्हज ऑब्झर्व्हेटरी) या धर्तीवर भारतात प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. भारतातील चार ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून त्यात औंढा नागनाथ तालुक्यातील अंजनवाडा, गांगलवाडी, दुधाळा तांडा, सावळी तांडा या भागातील सुमारे ३५० हेक्टर भूपृष्टाचा समावेश आहे. गेल्या वर्षी ६ डिसेंबरला नासाच्या पथकाने पाहणी केली होती. नुकतीच १८ नोव्हेंबरला पाहणी झाली होती. त्यानंतर आज पुन्हा त्या भागाची पाहणी करण्यात आली. पथकामध्ये नासाचे फ्रेड बेहजाद असिरी, लिगोचे फ्रेडरिक राब, पुणे येथील आयुकाचे वैज्ञानिक तरुण सौरदीप व शरद गावकर यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत औंढ्याचे नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव हे उपस्थित होते.
शास्त्रज्ञांचे दौरे वाढत असल्याने औंढा नागनाथची नासाच्या प्रयोगशसाळेसाठी निवड होण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या दौऱ्यात काय चर्चा झाली याबद्दल अधिक माहिती नायब तहसीलदार भालेराव यांनी दिली नाही. नेहमीप्रमाणे ही भेट होती असे त्यांनी सांगितले.