आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाथांच्या पालखीचा गारमाथ्याच्या डोंगरातून खडतर प्रवास

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण - भक्तिरसात चिंब झालेले वारकरी... टाळ-मृदंगाचा गजर... गर्वाने फडकणार्‍या भगव्या पताका आणि विठुनामाचा जयघोष अशा चैतन्यमय वातावरणात नाथांची पालखी ओढण्याचा सोहळा शनिवारी पार पडला. बीड जिल्ह्यातील हटकरवाडी (ता. पाटोदा) येथे गारमाथ्याच्या डोंगरातून पाच किलोमीटर पालखी ओढण्याचा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी झाली होती. नाथांच्या दर्शनाने तृप्त झालेल्या भाविकांनी ‘माझ्या जिवाची आवडी, पंढरपुरा नेईन गुढी’ हा अभंग आळवत हा अनुपम क्षण अनुभवला. 29 जून रोजी पैठणहून निघालेली संत एकनाथांची पालखी शनिवारी या भागात दाखल झाली.

जवळपास 10 हजार वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत. 19 दिवसांचा मुक्काम करत पंढरपूरला पोहोचणार्‍या नाथांच्या दिंडीचा सर्वात खडतर प्रवास पाटोदा तालुक्यातील रायमोहा परिसरातून होतो. उंचच उंच डोंगररांगा अन् हिरवाईने नटलेल्या हटकरवाडी भागातील पाच किलोमीटरचा रस्ता अत्यंत खडतर आहे. या भागात नाथांची दिंडी पोहोचताच परिसरातील युवक नाथांची पालखी ओढतात.

वारकर्‍यांसाठी एकच टँकर
29 जून रोजी पैठणहून निघालेल्या नाथांच्या पालखीसोबत इतर 14 दिंड्या होत्या. त्यांची संख्या आता 25-30 वर पोहोचली असून जवळपास 10 हजार वारकर्‍यांचा यात सहभाग आहे. मात्र, या वारकर्‍यांसाठी प्रशासनाने केवळ एकाच टँकरची व्यवस्था केली आहे. त्यामुळे वारकर्‍यांनाही पाण्यासाठी भटकावे लागत आहे.

दुरुस्ती आवश्यक
या भागातील रस्ते खूपच अरुंद आहेत. त्यामुळे भाविकांसह वारकर्‍यांनाही अडचणींचा सामना करावा लागतो.
- रघुनाथबुवा गोसावी, दिंडीप्रमुख

डांबरीकरण व्हावे
चार किलोमीटरचा डोंगर पार करण्यासाठी भाविकांना जास्त वेळ लागतो. या मार्गाचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
- हिराणी सदगर, उपसरपंच, हटकरवाडी