आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय महामार्गाचे काम 24 तासांतच उखडले!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू असून रात्री थंडी व दिवसा वाहतुकीमुळे कामात अडथळे येत आहे. काही ठिकाणी तर चोविस तासांतच डांबरीकरण उखडल्याने रस्त्यावर खडी पसरली आहे. खडीमुळे दुचाकीस्वारांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लागतात. उखडलेल्या डांबरीकरणाचे काम पुन्हा करण्याची मागणी होत आहे.
रस्त्यावर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ते खराब झाले असून वारंवार होणारी अपघात टाळण्यासाठी शहरातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 वर साईपॅलेस ते बार्शी नाका पूलादरम्यानच्या पावनेतीन किलोमीटरचे काम मागील चार दिवसांपासून सुरू आहे. या कामावर अंदाजे तीन कोटी रुपये खर्च होणार असून परळीच्या एका कंत्राटदाराला हे काम देण्यात आले आहे. सुरुवातीला हे काम रात्री सुरू झाले होते. परंतू थंडी वाढल्याने रात्री मजूर काम करण्यास तयार होत नसल्याने दिवसाच हे काम करण्यात येऊ लागले. त्यामुळे दिवसभर या महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे.वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून उपविभागीय अभियंत्यानी शहर वाहतूक पोलिसांची मदत मागविली आहे. यामुळे सुरुवातीला डांबरीकरणाचे काम व्यवस्थित झाले परंतू बार्शी रोडवरील जुन्या आरटीओ कार्यालयाच्या पुढील रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याने चोविस तासांतच रस्त्यावरील डांबर निघून खडी पसरू लागली. यामुळे दुचाकी वाहने घसरण्याची शक्यता निर्माण झाली. त्या भागात डांबरीकरणाची जाडी ही कमी दिसून येत आहे. रस्त्याच्या बाजूला असलेले विजेचा खांबामुळे ही सध्या कामात अडथडा येत आहे. काही ठिकाणी खांबा शेजारी डांबरीकरण करण्यात आले. खांबापर्यंत रोलर जात नसल्याने सपाटीकरण करता येत नाही.
सूचना फलक न लावता काम सुरू - राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. अशा वाहतुकीत हे काम सुरू आहे. वाहनचालक व्यवस्थितपणे वाहने चालवून कंत्राटदाराला मदत करत आहेत. म्हणून दुर्घटना टळत आहेत. मात्र, काम चालू असल्याचा सूचना फलक लावलेला नाही. एखादा कामगारही हातात लाल झेंडा घेऊन काम चालू असलेल्या ठिकाणी उभा राहत नाही. त्यामुळे वाहन चालकांना जवळ आल्यावरच रस्त्याचे काम चालू असल्याचे दिसते.