आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nationalist Congress Party News In Marathi, Divya Marathi, State Minister

विरोधात प्रचारकार्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या राज्यमंत्र्यांसह सहा पदाधिका-यांना नोटिसा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फौजिया खान - Divya Marathi
फौजिया खान
परभणी - लोकसभा निवडणुकीतील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे परभणीतील उमेदवार विजय भांबळे यांच्याविरोधात प्रचारकार्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यमंत्री फौजिया खान, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांच्यासह सहा जणांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयाने नोटिसा बजावल्या आहेत. या नेतेमंडळींना याबाबतचा खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

राज्यमंत्री फौजिया खान, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपुडकर, जालना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कीर्ती उढाण, परतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बाबासाहेब आकात यांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. याबाबतच्या वृत्तास पक्षाचे जिल्हाध्यक्ष व लोकसभेचे उमेदवार विजय भांबळे यांनी दुजोरा दिला आहे.

परभणी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष भांबळे यांना उमेदवारी देण्यापासून माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांचा विरोध होता. त्यासाठी त्यांनी प्राथमिक टप्प्यात राज्यमंत्री फौजिया खान यांचेही नाव सुचवले होते. या विरोधानंतरही पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भांबळे यांचीच उमेदवारी निश्चित केली होती. वास्तविक, वर्षभरापूर्वीच भांबळे यांना कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले होते. त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर केंद्रीय मंत्री शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभांना, कार्यकर्ता मेळाव्याला माजी राज्यमंत्री वरपुडकर, राज्यमंत्री फौजिया खान यांनी नावालाच हजेरी लावली. दोघांनीही शेवटच्या दोन दिवसांत आपला विरोध खुलेपणाने कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवला. प्रचारकार्य करणा-या नगरसेवक, पदाधिका-यांना मतदानाच्या आदल्या दिवशी सज्जड दम दिल्याने ही मंडळी मतदानाच्या दिवशी केंद्रावरही हजर राहिली नाहीत. माजी जिल्हाध्यक्ष विजय वरपुडकर यांनीही सुरुवातीपासून विरोध कायमच ठेवला. काँग्रेसचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्यासह नंतर त्यांनीही जाहीर विरोध करीत गावागावांतून भांबळेंविरोधात काम केले. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष समशेर वरपुडकर यांनीही विरोधाचीच भूमिका घेतली. कीर्ती उढाण व बाबासाहेब आकात यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भांबळे यांच्या प्रचारकार्यात सहभाग नोंदवला नाही.

मतदारसंघाच्या आढाव्यानंतर नोटिसा
या सर्व बाबींचा अहवाल पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडे सादर झाला होता. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी चार दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत परभणी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. त्यातून पक्षविरोधात काम करणा-या या पदाधिका-यांना नोटिसा देऊन त्यांचा लेखी खुलासा मागवावा, असे स्पष्ट निर्देश पवार यांनी दिले.