आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूरात अजाबलीने नवरात्रोत्सवाची सांगता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर - ‘आई राजा उदो उदो’च्या जयघोषात दुपारी 12 वाजता होमकुंडावर पारंपरिक अजाबलीच्या धार्मिक विधीने घटोत्थापन होऊन नवरात्रोत्सवाची सांगता झाली. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांनी तुळजाभवानीचे दर्शन घेतले. सायंकाळी सात वाजता नगरच्या पलंग पालखीचे आगमन झाले. सोमवारी पहाटे देवीचे सीमोल्लंघन होईल.

पहाटे एक वाजता चरणतीर्थ होऊन नित्योपचार पूजेनंतर सकाळी 10 वाजता रविवारच्या पूजेचे मानकरी सतीश मलबा यांनी देवीची आरती करून अंगारा काढला. दरम्यान, अजाबलीचे मानाचे बोकड सिंदफळ (ता. तुळजापूर) येथून वाजत-गाजत शहराच्या प्रमुख मार्गावरून होमकुंडावर आणण्यात आले.

दुपारी 12 वाजता तहसीलचे शिपाई मानकरी विलास शिंदे यांनी आई राजा उदो उदोच्या जयघोषात होमकुंडावर अजाबलीचा धार्मिक विधी पार पडला.


श्रमनिद्रा
सीमोल्लंघनानंतर देवीला नगरच्या पलंगावर पाच दिवसांच्या र्शमनिद्रेसाठी सिंह गाभार्‍यात निद्रिस्त करतात. सकाळी 8 वाजता पलंगावरच देवीचे चरणतीर्थ होऊन सुवासिक तेलाने अभिषेक पूजेस प्रारंभ करण्यात येते. तत्पूर्वी सीमोल्लंघनानंतर मंदिर संस्थानतर्फे गोंधळी, नगरचे मानकरी यांच्यासह सर्व मानकर्‍यांचा भरपेहराव आहेर देऊन सत्कार करण्यात येतो.


15 लाख भाविकांची हजेरी
नयनरम्य सीमोल्लंघन होणार
पहाटे एक वाजता अभिषेक पूजेनंतर देवीच्या सीमोल्लंघनाची तयारी सुरू करण्यात आली. पहाटे सिंहासनाजवळ दोन धार्मिक विधी करून देवीच्या मूर्तीला 108 साड्यांमध्ये गुंडाळून भिंगारच्या पालखीतून मंदिराला प्रदक्षिणा मारली जाते. या वेळी कुंकवाची मुक्त उधळण करतात. सूर्योदयाच्या पहिल्या किरणात होणार्‍या या देवीच्या सीमोल्लंघनाचा विहंगम सोहळा टिपण्यासाठी भाविक उपस्थित असतात. संबळाच्या कडकडाटात आणि आई राजा उदो उदोच्या जयघोषात होणार्‍या या सोहळ्याला जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष व इतर विश्वस्त, पुजारी, मंदिराचे कर्मचारी उपस्थित असतात.


मंदिरातील घटोत्थापन
होमावरील धार्मिक विधीनंतर मंदिरातील तुळजाभवानीचे घट उठवण्यात आले. देवीच्या घटेत्थापनानंतर त्रिशूल यमाई आणि मातंगी मंदिरातील घटोत्थापन करण्यात आले. मंदिरातील घटोत्थापनानंतर घरातील घट उठवण्यात येऊन नऊ दिवसांच्या उपवासाची सांगता करण्यात आली. नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या शारदीय नवरात्र महोत्सवाची अजाबलीनंतर घटोत्थापनाने सांगता झाली.