आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटोत्थापनाने नवरात्राची सांगता, होमकुंडावर अजाबळीचा धार्मिक विधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर - 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषात होमकुंडावर अजाबळीचा पारंपरिक धार्मिक विधी पार पडला. त्यानंतर घटोत्थापनाने नवरात्रोत्सवाची सांगता झाली.
या वेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविक उपस्थित होते.
दरम्यान, आश्विन पौर्णिमेपर्यंत तुळजापुरात दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरूच असतो. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानीच्या नवरात्रातील महत्त्वाचा दिवस म्हणजे दुर्गाष्टमी. गुरुवारी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजून १० मिनिटांपर्यंत वैदिक होम व हवन करण्यात आले. मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियंका आणि मातोश्री प्रमिला यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. शुक्रवारी (दि. ३) दुपारी १२ वाजता होमावर अजाबळीचा धार्मिक विधी पार पडला.

नऊ दिवसांत पंधरा लाख भाविक : अजाबळीच्या धार्मिक विधीनंतर नऊ दिवसांपासून पंधरा लाखांहून अधिक भाविकांनी श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

आज तुळजाभवानीचे सीमोल्लंघन : शनिवारी (दि. ४) पहाटे तुळजाभवानीचा सीमोल्लंघनाचा सोहळा होणार आहे. त्यानंतर नगरच्या पलंगावर श्रमनिद्रेसाठी देवी विसावेल. तत्पूर्वी सायंकाळी उशिरा नगरच्या पालखीचे शहरात आगमन होईल. रात्री राजा कंपनी चौक, साळुंके गल्लीतून महाद्वारमार्गे पलंग पालखीचे वाजतगाजत मंदिरात आगमन होईल.

लातुरात दसरा उत्साहात
शहर व जिल्ह्यात दसरा उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथेप्रमाणे नागरिकांनी सीमोल्लंघन केले. गावात कारभा-यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. बऱ्याच गावी अश्वस्वाऱ्याही झाल्या. ग्रामदैवत व जगदंबेचे दर्शन घेऊन नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा िदल्या. लातूरात सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या मिरवणुकीने लक्ष वेधले.