आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीने गड राखला, काँग्रेसची पीछेहाट, शिवसेना-भाजपची सरशी (महाकौल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 परभणी-  जि ल्हा परिषदेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसने आपला गड कायम ठेवत ५४ पैकी २४ जागा पटकावित बहुमताच्या काठावर जाण्याचा मान मिळविला. शिवसेना व भाजपने बेरजेचे राजकारण यशस्वी करीत पूर्वीपेक्षा जास्तीच्या जागा मिळविल्या. मात्र, काँग्रेसची जिल्ह्यात मोठी पीछेहाट झाली. परभणी तालुका वगळता काँग्रेसला कुठेही यश न मिळाल्याने पक्षाचे नेतृत्व असलेल्या जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर व माजी आ. रामप्रसाद बोर्डीकरांना मोठा धक्का बसला आहे. रासपनेही तीन जागांवर यश संपादन केले आहे.  
राष्ट्रवादीला बहुमताचा आकडा गाठता न आल्याने जिल्हा परिषदेवरील सत्ता स्थापनेची समीकरणे जुळविण्यासाठी पक्षाला आता अपक्ष वा रासपची मदत घ्यावी लागणार आहे. या सत्तासमीकरणांत भाजपही निर्णायक राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.  
 
राष्ट्रवादीला जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघात मोठे यश संपादन करता आले. १५ पैकी १३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसने यश मिळवित आमदार विजय भांबळे यांचे या मतदारसंघावरील एकतर्फी वर्चस्व सिद्ध केले आहे. काँग्रेसचे माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांना नामोहरण करण्यात आ.भांबळे यशस्वी ठरले आहेत. या मतदारसंघात केवळ २ जागांवर शिवसेनेला मिळालेले यश शिवसेनेचा या मतदारसंघातील चंचुप्रवेश करणारा ठरला आहे.
 
 जिल्हाध्यक्ष आ.बाबाजानी दुर्राणी यांनी पाथरी तालुक्यावरील एकतर्फी वर्चस्वाला या वेळी शिवसेनेने छेद देत २ जागांवर यश मिळविले. तीन जागा टिकविण्यात आ. बाबाजानींना यश आले आहे. सोनपेठ तालुक्यातही राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व राखण्यात जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष राजेश विटेकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष बाबाजानींना यश आले आहे.
 
तालुक्यातील तीनही जागा राष्ट्रवादीने ताब्यात घेतल्या. मानवत, गंगाखेड, पालम या
तालुक्यांत प्रत्येकी एक तर पूर्णेत दोन जागांवर राष्ट्रवादीला यश मिळाले. गंगाखेडचे आ.डॉ.मधुसूदन केंद्रे यांनाही आपल्या मतदारसंघात चार जागा मिळविता आल्याने पक्ष बहुमताच्या काठावर जाऊन पोहाेचला. 
 
शिवसेनेने बेरजेचे राजकारण करताना मागील वेळेपेक्षा तब्बल ५ अधिकच्या जागा मिळवित जिल्हा परिषदेत क्रमांक दोनचे स्थान मिळविले. खा.संजय जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, आ.मोहन फड या तिघांनीही केलेल्या प्रतिष्ठेच्या जागा ताब्यात घेतल्या आहेत. विशेषत: परभणी तालुक्यात १० पैकी पाच जागांवर शिवसेनेने यश मिळवित वर्चस्व सिद्ध केले.
 
जिंतूर, सेलूत दोन जागा तर पाथरीतही दोन जागा मिळवून शिवसेनेने आ.बाबाजानी, आ.भांबळे यांच्या प्रभावक्षेत्रात जोरदार प्रवेश केला. पूर्णेतही शिवसेनेने दोन, मानवतमध्येही दोन जागांवर शिवसेनेला यश मिळाल्याने शिवसेनेचा जोरदार विजय ठरला.  

आतापर्यंत जिल्हा परिषदेत दोनपेक्षा अधिक संख्या न मिळणाऱ्या भाजपने या वेळी जोरदार सरशी करीत पाच जागांवर यश मिळविले. गंगाखेड तालुका हा भाजपचा प्रभावक्षेत्र असून तो कायम राखताना भाजपने या वेळी पालम, पूर्णा, परभणी या तीन तालुक्यांतही प्रत्येकी एक सदस्य निवडून आणत आपले संख्याबळ वाढविले.
 
मात्र, भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या वहिनी डॉ.अक्षदा शिवाजी भरोसे यांना पराभवास तोंड द्यावे लागले. सेलूतही भाजपचे विधानसभेचे उमेदवार राहिलेले संजय साडेगावकर यांनाही पराभव स्वीकारावा लागला.  काँग्रेसची मात्र, जिल्ह्यात दाणादाण उडाली असून मागील वेळी ११ सदस्यसंख्येवर असलेल्या काँग्रेसला पाच जागा गमवण्याची वेळ आली. केवळ सहा जागांत परभणी तालुक्यातच तीन जागांवर काँग्रेस विजयी होऊ शकली.
 
बातम्या आणखी आहेत...