आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पंडितअण्णा अमर रहे’च्या घोषणा,कार्यकर्ते शोकाकुल; पंकजांकडून धंनजय मुंडेंचे सांत्वन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंकजा मुंडे धंनजय मुंडे यांचे सांत्वन करताना - Divya Marathi
पंकजा मुंडे धंनजय मुंडे यांचे सांत्वन करताना
परळी - राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितअण्णा मुंडे यांच्या पार्थिवावर परळीजवळील कन्हेरवाडी येथील त्यांच्या शेतात शुक्रवारी दुपारी तीन वाजता शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबवत्सल, निर्भय धाडसी नेतृत्वाला निरोप देताना परळीकरांचे डोळे पाणावले. पुत्र धनंजय मुंडे यांनी अण्णांच्या चितेला जेव्हा अग्निडाग दिला तेव्हा कार्यकर्त्यांनी ‘पंडितअण्णा अमर रहे’च्या घोषणा दिल्या. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, प्रज्ञाताई मुंडे यांच्यासह मुंडे परिवारातील सदस्य शोकाकुल झाले होते.
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडितअण्णा मुंडे यांचे गुरुवारी रात्री आठ वाजता हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच मराठवाड्यातील त्यांचे कार्यकर्ते, शेतकरी, कुटुंबातील सदस्यांनी परळी शहरातील पंढरी या निवासस्थानी अंत्यदर्शन घेण्यासाठी गर्दी केली. पालकमंत्री पंकजा मुंडे, प्रज्ञाताई मुंडे, खा. प्रीतम मुंडे यांनी उपस्थित राहून अंत्यदर्शन घेत भाऊ धनंजय मुंडे यांचे सांत्वन केले. अगदी सकाळपासूनच नागरिकांची पावले अण्णांच्या अंत्यदर्शनासाठी पंढरी निवासस्थानाकडे वळत होती. निवासस्थानी अण्णांचे पार्थिव सजवलेल्या शामियान्यात ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजता धनंजय यांच्या निवासस्थानापासून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. ही अंत्ययात्रा कन्हेरवाडीच्या त्यांच्या शिवारात पोहाेचली तेव्हा हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. अण्णांचे पार्थिव चौथऱ्यावर ठेवण्यात आले. ब्रह्मवृंदांच्या मंत्रघोषात अंत्यविधीला सुरुवात झाली.
या वेळी जलदान विधीमध्ये अण्णांच्या सर्व कुटुंबीयांनी सहभाग घेतला. पुत्र धनंजय मुंडे यांनी दुपारी तीन वाजता वडिलांच्या चितेला अग्निडाग दिला. अंत्यसंस्कारास राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, आमदार मधुसूदन केंद्रे, विक्रम काळे, अमरसिंह पंडित, संगीता ठोंबरे, आर. टी. देशमुख, सतीश चव्हाण, अनिल भोसले, माजी मंत्री सुरेश धस, पंडितराव दौंड, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रा. टी. पी. मुंडे, भाजपचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड, उद्योगपती रत्नाकर गुट्टे आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पंडितअण्णा मुंडे यांच्या निधनाचा शोक व्यक्त करत संदेश पाठवला.
^पंडितअण्णा मुंडेयांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले आहे. त्यांनी कार्यकर्त्यांसाठी प्रसंगी संघर्षाची भूमिका घेण्यास कधीही मागेपुढे पाहिलेले नाही. कायम सामान्यांचा ध्यास असलेला नेता आपल्यातून गेल्याचे दु:ख आहे. -अजितपवार, माजी उपमुख्यमंत्री.
बातम्या आणखी आहेत...