आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NCP Leader Sharad Pawar And Shivraj Chakurkars Meet In Latur

राजकीय भूकंप: लातुरातील मुक्कामात शरद पवार-चाकूरकरांचे गुफ्तगू‌

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुक्कामी राहिल्यानंतर लातूरच्या राजकारणात भूकंप झाल्याचा इतिहास घडल्याचे वृत्त दोन दिवसांपूर्वीच दैनिक "दिव्य मराठी'ने दिले होते. पवारांनी आपल्या शनिवारच्या लातूर मुक्कामात डॉ. जे. एम. वाघमारेंना दुसऱ्या गाडीत बसवून स्वत:च्या गाडीत बसत असलेल्या शिवराज पाटील चाकूरकरांना आपल्या गाडीत बसवून घेतले. चालकाशिवाय गाडीत दुसरे कुणीच बसले नाही याची खात्री करवून घेतल्यानंतरच पवारांची गाडी पुढे गेली अन् पवार-चाकूरकरांत पंधरा मिनिटे गुफ्तगू झाली.

उस्मानाबादचा मोर्चा संपवून शरद पवार शुक्रवारी लातूर मुक्कामी आले. चहापान घेत त्यांनी लातूरमधील पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. जनार्दन वाघमारेंसह स्थानिक नेत्यांशी संवाद साधला. त्यानंतर ते ठरल्यानुसार वाघमारेंसह ते राष्ट्रवादीचे स्थानिक नेते संजय बनसोडे यांच्या घरी भोजनासाठी गेले. या विशेष मेजवानीला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. त्यानुसार चाकूरकरही आपल्या गाडीतून तेथे पोहोचले. जेवण आटोपून बाहेर पडल्यानंतर नेहमीप्रमाणे शरद पवारांच्या गाडीत बसण्यासाठी डॉ. जनार्दन वाघमारे पुढे सरसावले. मात्र पवारांनी, "वाघमारे सर, आपण दुसऱ्या गाडीतून या' असे सांगितले. तर आपल्या गाडीकडे मार्गस्थ होत असलेल्या शिवराज पाटील चाकूरकरांना खास बोलावून घेत "पाटील साहेब, आपण माझ्या गाडीत चला' अशी सूचना केली. त्याला होकार दर्शवत चाकूरकर लगेचच पवारांच्या गाडीत बसले. तर शरद पवार नेहमीप्रमाणे चालकाशेजारील आपल्या जागेवर आसनस्थ झाले. विशेष म्हणजे पवारांनी मागे वळून चाकूरकरांशिवाय गाडीत दुसरे कुणी बसले तर नाही याची खात्री करून घेतली आणि त्यांची गाडी विश्रामगृहाकडे मार्गस्थ झाली. संजय बनसोडे यांच्या घरापासून ते शासकीय विश्रामगृहापर्यंत पोहोचण्याच्या पंधरा मिनिटांच्या काळात पवार आणि चाकूरकरांमध्ये काय बातचीत झाली. खरे तर शिवराज पाटील यांना आजवर किमान लातूरमध्ये तरी इतर नेत्यांच्या गाडीत बसल्याचे कधीच कुणी पाहिलेले नाही. त्यामुळे चाकूरकर पवारांच्या गाडीत बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विश्रामगृहावर पोहोचल्यानंतर पवारांना तेथे सोडून शिवराज पाटील चाकूरकर लगेचच आपल्या निवासस्थानकडे रवाना झाले. खरे तर या दोघांना विश्रामगृहातील एखाद्या कक्षात बसून बोलता आले असते. मात्र, या दोघांनी बंद दाराआड चर्चा केली असती तर त्याची मोठी चर्चा रंगली असती. तसेच चाकूरकरांच्या घरी नाष्टा करण्यासाठी शनिवारी सकाळी पवारांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र तेथे पंकजा मुंडेंसह इतरही नेते असल्यामुळे पवारांनी खास गाडीत बसूनच चाकूरकरांशी बातचीत करण्याचा निर्णय घेतला असावा.

लातूरमध्ये यापूर्वी पवारांनी जेव्हा जेव्हा मुक्काम ठोकला आहे तेव्हा-तेव्हा लातूरच्या राजकारणात भूकंप झाल्याचा इतिहास आहे. मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असलेल्या विलासराव देशमुखांचा १९९५ मध्ये पराभव करण्यात पवारांचा हात होता हे राजकारणातील एक ओपन सिक्रेट आहे. लोकसभेच्या २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीतही पवारांनी लातूरमध्ये मुक्काम ठोकला आणि शिवराज पाटील चाकूरकरांचा पराभव झाल्याचा इतिहास असल्याचे वृत्त "दिव्य मराठी'ने शनिवारच्या अंकात दिले होते. त्याची चर्चा सुरू असतानाच आता पवार-चाकूरकरांचे गुफ्तगू झाल्यामुळे अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.