आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांच्या मुक्कामानंतर राजकीय भूकंपाचा इतिहास, नेत्यांच्या मनात भरली धडकी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - ज्यांच्या राजकीय खेळीचा अंदाज आजवर कुणालाच आलेला नाही अशा शरद पवारांनी आजवर जेव्हा-जेव्हा लातूरमध्ये मुक्काम केला तेव्हा-तेव्हा स्थानिक राजकारणात भूकंप झाल्याचा इतिहास आहे. त्यामुळेच दुष्काळ दौऱ्यात पवार तिसऱ्यांदा लातूर मुक्कामी असल्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा उठला आहे.

महाराष्ट्रात आपल्याला जड जातील अशा राजकीय नेत्यांना शरद पवारांनी मोठे होऊ दिलेले नाही. त्यामुळेच विलासराव देशमुखांची मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा लक्षात आल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये विलासरावांच्या विरोधात उभे ठाकलेल्या शिवाजीराव पाटील कव्हेकरांना छुपे बळ दिले होते. त्या वेळी लातुरात मुक्काम करून पवारांनी अनेकांना कानमंत्र दिला अन् विलासरावांचा पराभव झाला. विशेष म्हणजे पुढे १९९९ च्या विधानसभा निकालानंतर राजकीय अपरिहार्यतेमुळे शरद पवारांना विलासरावांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला पाठिंबा द्यावा लागला. त्यानंतर पुढची नऊ वर्षे पवार लातूरकडे फिरकले नाहीत. आजारपणातून बरे झाल्यानंतर २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ पवारांनी लातूरमधून केला होता. त्या वेळी लातूरमधून सलग सात वेळा निवडून आलेले शिवराज पाटील चाकूरकर आठव्यांदा नशीब आजमावत होते. त्या सभेनंतर पवारांनी मुक्काम केला.

त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी त्यांना १९९५ चा त्यांचा लातुरातील मुक्काम आणि विलासरावांच्या पराभवाची आठवण करून देत आता चाकूरकरांचं काय, असा प्रश्न केला होता. त्यावर उत्तर देण्याचं पवारांनी टाळलं होतं. योगायोगाने त्या निवडणुकीत चाकूरकरांचा पराभव झाला. त्यानंतर पवार शुक्रवारी प्रथमच लातूर मुक्कामी होते. त्यांच्या मुक्कामानंतर लातुरातील राजकीय भूकंपाचा इतिहास पाहता अनेकांच्या पोटात गोळा उठला आहे. मात्र, तूर्त कोणत्याही निवडणुका नसल्याचा संदर्भ देत काँग्रेसची मंडळी स्वत:चे समाधान करून घेत आहे.
चाकूरकरांकडे नाष्टा, दिलीपरावांकडे भोजन
लातूर दौऱ्यात शरद पवार शनिवारी सकाळी काँग्रेस नेते शिवराज पाटील चाकूरकरांच्या घरी नाष्ट्याला जाणार आहेत, तर दुपारचे भोजन ते विलासरावांचे बंधू आमदार दिलीपराव देशमुखांच्या घरी करणार आहेत.