आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांत जोरदार हाणामारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलू - राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष व माजी शहराध्यक्ष यांच्या गटात शनिवारच्या आठवडी बाजार मैदानात तुंबळ हाणामारीची घटना रविवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आल्याने दोन्ही गटाचे पाच जण गंभीर जखमी झाले असून पोलिस ठाण्यात तक्रार द्यायची नाही असा पवित्रा माजी शहराध्यक्ष शेख शफी यांच्या गटाने घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इसाक पटेल व माजी शहराध्यक्ष शेख शफी यांच्यात मोबाइल रकमेच्या जुन्या देण्यावरून शनिवार आठवडी बाजार मैदानात वाद झाला. तेव्हा दोन्ही गटांत लोखंडी रॉडने जोरदार हाणामारी झाली. यामध्ये माजी शहराध्यक्ष शेख शफी यांच्या गटातील निहाल वजीर, शेख असलम, शेख आरेफ, शेख रईस, शेख वजीर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी परभणी येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहे तर शहराध्यक्ष इसाक पटेल यांच्या गटातील अन्वर अफसर, शेख मुसा शेख हमीद, शेख शफी हे जखमी झाले असून त्यांच्यावर शहरातील माणिक हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, शनिवार आठवडी बाजार मैदानात भांडणे झाल्यानंतर समोरच पोलिस ठाणे असल्याने जमाव ठाण्यात गेला होता. जखमींना वेगवेगळ्या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले. पोलिस जबाब घेण्यासाठी रुग्णालयात गेले असता माजी शहराध्यक्ष शफी शेख यांच्या गटाने सेलू पोलिसात तक्रार द्यायची नाही, असे जमादार यू.के. लाड यांना सांगितले.
आमदार भांबळे अलिप्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजय भांबळे कार्यक्रमानिमित्त घटना सुरू असताना शहरातच होते. हा वाद पक्षातील पदावरून झाला की, उधारीवरून हे मात्र समजू शकले नाही. तरी राष्ट्रवादीच्या आजी-माजी शहराध्यक्ष गटात झालेल्या हाणामारीमुळे आणि आपल्याला सेलू पोलिसात न्याय मिळणार नसल्यामुळे एका गटाने सेलू पोलिसांवर अविश्वास दाखवून तक्रार देण्याचे टाळले याचीही चर्चा होत आहे.