आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रमिक साहित्य संमेलन: देशाला फुले - आंबेडकरांच्या विचारांची गरज; डॉ. रावसाहेब कसबे यांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- स्वातंत्र्य युध्दाच्या काळात देशाला जितकी महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, कार्ल मार्क्स यांच्या विचारांची होती, त्यापेक्षा जास्त गरज आज निर्माण झाली आहे. सध्याची परिस्थिती पाहता या महामानवांचे विचार शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे अपेक्षित असून त्यातच क्रांतीचे बिजे रोवली आहेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे यांनी केले. श्रमिक साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात ते बोलत होते.

कॉ. प्रभाकर संझगिरी साहित्य नगरीत आयोजित पहिल्या राज्यस्तरीय श्रमिक साहित्य संमेलनाचा सोमवारी समारोप झाला. यावेळी सीटूचे अध्यक्ष डॉ.डी.एल.कराड यांच्या अध्यक्षतेखाली “श्रमिकांचे मुक्ती लढे आणि त्यापुढील आव्हाने’ या विषयावर मंथन करण्यात आले. याप्रसंगी विचारवंत डॉ.रावसाहेब कसबे, साहित्यिक उत्तम कांबळे, माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, कुमार शिराळकर, स्वागताध्यक्ष साईनाथ पवार, संयोजन समितीच़े सचिव आण्णा सावंत, उद्धव भवलकर, सुभाष जाधव, किरण मोघे, विजय कांगणे, दत्ता माने आदींची उपस्थिती होती.  
 
प्रेमविवाहांमुळे जातिव्यवस्था संपेल
कसबे म्हणाले, क्रांती कशी होईल याचे सविस्तर विवेचन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या साहित्यातून केले आहे त्यानुसार श्रमिक व बहुजनांची वाटचाल असली पाहिजे. प्रस्थापित व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी शूद्र, दलित आदींनी एकत्र आले पाहिजे यात मराठ्यांचाही समावेश होतो, असे त्यांनी आवर्जून सांगितले. जास्तीत जास्त प्रेमविवाह झाले तर जाती व्यवस्था संपविण्यासाठी त्याची मदत होईल त्यासाठी मुला-मुलींना स्वातंत्र्य दिले पाहिजे, असे डॉ.कसबे यांनी सांगीतले.

एनजीओ पोसल्या
१९९० नंतर भांडवलशाही व्यवस्थेने कामगार नावाचा वर्ग संपविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातून कामगार चळवळ दाबण्यासाठी त्यांनीच पोसलेल्या एनजीओं ची मदत घेतली जात आहे, असे साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले.  यावेळी अमृत मेश्राम यांनी संमेलनातील ठरावांचे वाचन केले तर ज्येष्ठ साहित्यिक किशोर घोरपडे व उर्दू शायर शम्स जालनवी यांचा सत्कार करण्यात आला.

संमेलनातील ठराव
- अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधीत ठेवले पाहिजे 
-  गौरी लंकेश यांच्या हत्येचा निषेध,मारेकऱ्यांना अटक करा
-  शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे
- वाढती धर्मांधता,वाढता जातीयवाद व स्त्रियांवरील अत्याचार थांबवावेत
-  राज्यघटनेत बदल करण्याचा घाट घातला जात असल्याने घटनेचे संरक्षण करा.
- सरकारच्या कामगारविरोधी धोरणांचा निषेध,कामगार धोरणात बदल करू नये
-  अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपाला पाठिंबा.
बातम्या आणखी आहेत...