आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करालातूर- या वर्षीच्या बारावी बोर्ड परीक्षांचे निकाल आणि त्यापाठोपाठ लागलेल्या मेडिकल पूर्वपरीक्षेच्या (नीट) निकालात लातूरच्या नावाजलेल्या महाविद्यालयांना दबदबा राखण्यात अपयश आले आहे. एवढेच नव्हे तर नीट परीक्षेत लातूर जिल्ह्यात प्रथम आलेल्या दयानंदच्या विद्यार्थ्याला 720 पैकी 564 गुण पडले असून त्याची राज्यात 54 वी रँक आहे. त्यामुळे एरवी राज्यात पहिल्या पाचात असणारे लातूर या वर्षी पहिल्या पन्नासातही नाही. परिणामी तथाकथित ‘घोकंपट्टी’च्या लातूर पॅटर्नवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बारावी बोर्ड आणि मेडिकल-इंजिनिअरिंगसाठी घेतल्या जाणार्या सीईटी परीक्षेचा निकाल लागला की राज्यात सगळ्यांचेच लक्ष असायचे ते लातूरकडे. लातूरच्या दयानंद, शाहू, महात्मा गांधी या कॉलेजचा विद्यार्थी राज्यात पहिला येणार हे जणू समीकरणच बनले होते. पहिल्या 15 विद्यार्थ्यांमध्ये लातूरचे किमान 10 विद्यार्थी असणारच असा जणू अलिखित नियम बनला होता. मात्र, यावर्षी त्याला छेद गेला आहे.
दोन वर्षांपूर्वी खेळाचे अतिरिक्त 25 गुण घेऊन दहावीला 100 टक्क्यांपल्याड गुण मिळवणारी विद्यार्थ्यांची टीम बाहेर पडली. मात्र, दहावीत कागदोपत्री खेळांच्या मार्कांवर जोपासलेल्या या गुणवंतांचे पितळ यंदा लागलेल्या बारावीच्या परीक्षेत उघडे पडले. शंभर टक्के गुण घेऊन नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेणार्या या विद्यार्थ्यांना बारावीच्या परीक्षेत 80-85 टक्के गुण घेतानाही प्रचंड झगडावे लागले. पहिल्या पाचात येणाचा लौकिक असलेल्या लातूरच्या विद्यार्थ्यांचा यावर्षी राज्यात 54 वा क्रमांक आहे. तो दयानंदचा विद्यार्थी आहे. शाहूच्या नीटमधील टॉपर मुलाला 720 पैकी 549 गुण मिळाले आहेत, तर 1995 ते 2009 या कालावधीत सात वेळा राज्यात प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी देणार्या अहमदपूरच्या महात्मा गांधी विद्यालयाच्या नीटमधील टॉपर विद्यार्थ्याला 720 पैकी 492 मार्क मिळाले आहेत.
यश, दबदबा अन् उज्जवल परंपरा
बारावी परीक्षेमध्ये यावर्षी तुलनेने सुमार कामगिरी केलेल्या शाहू, दयानंद आणि महात्मा गांधी या कॉलेजेसनी प्रसिद्धी मिळवलीच. या तीनही कॉलेजेसनी बारावी परीक्षेत घवघवीत यश, दबदबा कायम राखला, उज्जव परंपरा अबाधित राखली, अशा आशयाच्या प्रेसनोट पाठवल्या. काही ठिकाणी त्या छापूनही आल्या, तर चांगल्या बातम्या आल्या नाहीत म्हणून एका कॉलेजने डिजिटल फलक लावून प्रसिद्धी मिळवली.
अपयश मान्य, आत्मपरीक्षण करणार
पहिल्या पंधरांमध्ये राहणारे लातूरचे विद्यार्थी यावर्षी बोर्ड आणि नीट परीक्षेत झळकले नाहीत. शाहू कॉलेजलाही अपेक्षित यश मिळाले नाही. हे अपयश आम्हाला मान्यच करावे लागले. आम्ही आत्मपरीक्षण करणार आहोत. 1999 मध्ये सीईटी सुरू झाल्यानंतर आम्हाला पहिल्या वर्षी अपयश आले होते. त्यानंतर आम्ही पुन्हा तयारी केली आणि प्रथम क्रमांक मिळवला. नीट आम्हाला नवी होती. पुढच्या वर्षी आम्ही नव्या दमाने मैदानात उतरणार आहोत. लातूर पॅटर्न घोकंपट्टीचा नाही.’’
-अनिरुद्ध जाधव, प्रशासकीय प्रमुख, शाहू कॉलेज, लातूर
तुलनेने चांगले यश
यंदा बारावीचा निकाल तसा कमीच लागला आहे. नीट परीक्षा नवी असल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचण आली, तरीही आमच्या महाविद्यालयाची 81 मुले मेडिकलला जातील. आमचाच विद्यार्थी जिल्ह्यात पहिला आला आहे. इतरांच्या तुलनेत हे यश चांगलेच आहे.
-दासराव सूर्यवंशी, प्रशासकीय अधिकारी, दयानंद कॉलेज
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.