आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चालकाचे हातपाय बांधून पळवला लसणाचा टेम्पो, चोरट्यांनी केली मारहाण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेकनूर - औरंगाबादहून सोलापूरकडे लसूण घेऊन जाणाऱ्या टेम्पोचालकाला मांजरसुंबा घाटात चोरट्यांनी बांधून मारहाण केली. यानंतर त्याचे हातपाय बांधून टेम्पो उस्मानाबादकडे पळवल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी नेकनूर ठाण्यात चार जणांवर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
नवी दिल्लीच्या कोटलापूर येथील रहिवासी असलेला टेम्पोचालक कुंडसिंग गौंडसिंग ठाकूर (५०) हा १६ जानेवारी रोजी टेम्पोमध्ये (एचआर ५५ आर ६००६) मध्ये लसूण भरून औरंगाबादहून सोलापूरकडे बीडमार्गे निघाला होता. रात्री हा टेम्पो मांजरसुंबा घाटात आला तेव्हा चार चोरट्यांनी टेम्पो अडवून चालक कुंडसिंग ठाकूर याला खाली ओढले. यानंतर त्याला जबर मारहाण करून त्याचे हातपाय बांधून टेम्पो थेट उस्मानाबादकडे पळवला. रात्री चालकाने
स्वत:ची सुटका करून घेत थेट नेकनूर पोलिस ठाणे गाठले. घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्याने नेकनूर ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चार चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मांजरसुंबा घाटाची सुरक्षितता धोक्यात
बीड तालुक्यातील महत्त्वाच्या व अवघड असलेल्या मांजरसुंबा घाटात कुठलीच सुरक्षा नसल्याने सातत्याने वाटमारीच्या घटना घडत आहेत. या ठिकाणी वाहनधारकांच्या सुरक्षेसाठी पोलिस चौकीही नाही. त्याचबरोबर रात्रीच्या वेळी घाटात अंधार व परिसरात गर्द झाडी असल्याने येथे वाटमारीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे येथे पोलिस चौकी मंजूर करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी केली आहे.