आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीने वसमत ते नेपाळ 1450 किमीचा प्रवास करत लावली बौद्ध महासंमेलनाला हजेरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- वसमत ते देवदाह, नेपाळ असा सुमारे १४५० किमी अंतर मोटारसायकलने पार करून वसमत येथील दोन तरुणांनी नेपाळ सरकारने आयोजित केलेल्या बौद्ध महासंमेलनाला हजेरी लावली.  नेपाळला जाताना सहा दिवस तर परत येताना हेच अंतर त्यांनी केवळ तीन दिवसांत पूर्ण केले. प्रवासादरम्यान या तरुणांनी व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन आणि राष्ट्रवादाचा प्रसार केला. 

वसमत येथील माता रमाई ग्रुपचे अध्यक्ष कांचन खंदारे आणि आंबेडकरी युवा नेते राहुल करवंदे यांनी  एकाच मोटारसायकलवरून प्रवास करून नेपाळवारी केली आहे. भारताच्या सीमेलगत नेपाळमधील देवदाह येथे १४ ते २१ ऑक्टोबर दरम्यान बौद्ध महासंमेलन होत आहे. या संमेलनाला हजेरी लावण्यासाठी तसेच ठिकठिकाणी भेटी देऊन, स्थानिक नागरिकांशी संवाद साधता यावा हेतूने दोघेही  वसमत येथून ५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता प्रवासाला निघाले.  वसमत - अर्धापूर - उमरखेड - यवतमाळ - वर्धा - नागपूर - रामटेक - धूमा - जबलपूर - कटणी - रिवा - बनारस - गोरखपूर - महाराजगंज - देवदह (नेपाळ) या मार्गाने ११ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ च्या सुमारास नेपाळ हद्दीत  पोहोचले. १२ ते १३ ऑक्टोबर रोजी पर्यटन करून त्यांनी १४ रोजी सुरू झालेल्या बौद्ध महासंमेलनाला हजेरी लावली. या वेळी आयोजकांनी दोघांचाही सत्कार केला. संमेलनात आपले मनोगत व्यक्त करून दुपारनंतर परतीचा प्रवास सुरू केला. १४ ऑक्टोबर रोजी २ वाजता निघालेले हे तरुण गेल्या मार्गानेच परंतु एका दिवसात ४०० ते ४५० किमी अंतर पार करून  १७ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता वसमत येथे पोहचले.  

मुक्कामाच्या ठिकाणी व्यसनमुक्तीचा प्रसार
 वसमत येथे व्यसनमुक्तीचे काम करणाऱ्या या तरुणांनी नेपाळला जातानाही जेथे मुक्काम पडला त्या ठिकाणी छोटेखानी कार्यक्रम घेऊन व्यसनमुक्ती, अंधश्रद्धा निर्मूलन, राष्ट्रवाद याबाबत प्रचार व प्रसार केला. माता रमाई ग्रुपच्यावतीने बहुजन जनजागृती व व्यसनमुक्ती अभियान संपूर्ण वसमत तालुकाभर यशस्वीपणे राबवून ४१७ जणांना  व्यसनमुक्त केले आहे. या अनुभवाचाच त्यांना प्रवासा दरम्यान चांगलाच फायदा झाला.   या कामानिमित्त त्यांचा ठिकठिकाणी सत्कारही करण्यात आला. तर नेपाळचा दौरा यशस्वी केल्याबद्दल बुधवारी  कांचन खंदारे आणि राहुल करवंदे यांचा वसमतकरांनी सत्कार केला.
बातम्या आणखी आहेत...