आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिऊर : दुहेरी हत्याकांडातील आरोपी अखेर जेरबंद; शेतीच्या वादातून भावजय, पुतण्याचा केला होता खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
शिऊर  - शेतजमिनीच्या वादातून सख्खी भावजय व पुतण्याचा धारदार शस्त्राने खून आल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील जिरी येथे ६ जून रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास घडली होती. यातील  आरोपी राजेंद्र सूर्यवंशी हा खून करून फरार झाला होता. त्याला जेरबंद करण्यात अखेर बारा दिवसांनंतर पोलिस यंत्रणेला यश आले असून गुन्हे अन्वेषण विभागाचे पथकाने पुणे जिल्ह्यातील आळंदी येथून त्याला ताब्यात घेतले आहे.
 
जिरी येथील गट क्रमांक १०८ येथे सूर्यवंशी परिवाराची  शेतजमीन असून  शेतजमिनीची वाटणी करण्यात येऊन बांधावर सिमेंटचे खांबही रोवलेले होते. ६ जून  रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास राजेंद्र सूर्यवंशी हा शेताच्या बांधावर रोवलेले खांब उखडून टाकत होता. दरम्यान, रूपाली सूर्यवंशी यांनी शेताकडे धाव घेऊन खांब पुन्हा रोवण्याचा प्रयत्न केला असता राजेंद्र सूर्यवंशी याने धारदार कोयता आणून  रूपाली यांच्या मानेवर वार करत खून केला. दरम्यान, आईच्या बचावासाठी पुढे आलेला त्यांचा १५ वर्षीय मुलगा गोकुळवरही राजेंद्रने शस्त्राने हल्ला केल्याने दोघे मायलेक जागीच ठार झाले. तर, आई व भावाला मारहाण होत असताना मुलीने पळ काढल्याने ती बचावली. हे क्रूर कर्म करून राजेंद्र फरार झाला होता. तो कीर्तनकार असल्याने मंदिर किंवा मठातच असणार, असा पोलिसांचा अंदाज होता.  अखेर पोलिस यंत्रणेला गुप्त खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आळंदी येथे सापळा रचून आरोपी राजेंद्र सूर्यवंशीला बेड्या ठोकल्या.
 
पाच दिवसांची पोलिस काेठडी  
 
सपोनि धनंजय फराटे, रोहिदास तांदळे यांच्या सहकाऱ्याने गुन्हे अन्वेषण विभागाचे सपोनि विवेक जाधव, सहायक फौजदार गफ्फार पठाण, विक्रम देशमुख, गणेश मुळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपी राजेंद्र याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील लांजेवार यांनी दिली.