आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाण्या अभावी नवीन बांधकामांवर टाच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - जिल्ह्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी उपलब्ध पाणीसाठा जतन करण्याच्या उद्देशाने सुरू असलेली बांधकामे थांबविण्याचा व नवीन बांधकाम परवाना न देण्यासंबंधी निर्णय लवकरच जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात येणार असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. सध्या पाणीटंचाई असली तरीसुद्धा घर, रो-हाऊसेस, फ्लॅटचे विविध ठिकाणी बांधकाम सुरू आहे. पाण्याच्या उपलब्धतेनुसार कमीअधिक प्रमाणात सर्वत्र हे चित्र पाहावयास मिळते. बांधकामांना मोठय़ा प्रमाणात पाणी लागते. त्यामुळे हे पाणी वाचवणे हे मोठे आव्हान आहे. जिल्ह्यात पावसाची वार्षिक सरासरी (जून-सप्टेंबर) 634.16 मि.मी. एवढी आहे. आजपर्यंत अर्थात 16 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात एकूण 400.25 मि.मी. पाऊस पडायला हवा होता. मात्र, प्रत्यक्षात 150.14 मि. मी. एवढाच पाऊस झाला. यातही असमानता असून परतूर तालुक्यात सर्वाधिक म्हणजे 204.70 मि.मी.एवढा पाऊस पडला, तर अत्यंत कमी पाऊस अंबड तालुक्यात झाला. आतापर्यंत सरासरीच्या फक्त 21 टक्के पाऊस झाला. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना पावसाळय़ातसुद्धा पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. भूजल पातळीतही मोठय़ा प्रमाणात घट झाल्यामुळे कूपनलिकासुद्धा आटल्या आहेत. सध्या एकट्या जालना शहरात 50 टँकरद्वारे, तर ग्रामीण भागात 48 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. यावरून पाणीटंचाईचा अंदाज येऊ शकतो. जालना शहरापासून जवळच असलेल्या घाणेवाडी तलावातही फक्त दहा दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. या पार्श्वभूमीवर शहागड-जालना पाणीपुरवठा योजनेंतर्गत जायकवाडी धरणातून शहागड येथील बंधार्‍यात पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे जालना शहरातील काही भागांचा पाणीप्रश्न काहीअंशी सुटलेला आहे. मात्र, भविष्यात पाऊसच पडला नाही तर पुन्हा अन्य स्रोतांचा विचार करावा लागणार आहे. यासंदर्भात संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाकडून आराखडा तयार करण्यात आला आहे. यातच पाणी बचतीसाठी बांधकामे थांबविण्याचा विचार प्रशासनाकडून केला जात आहे. यावर शिक्कामोर्तब झाल्यास जालना शहरातील किमान 100 वर बांधकामांवर टाच येऊ शकते, शिवाय दररोज वापरले जाणारे हजारो लिटर पाणी यामुळे वाचवणे शक्य होईल. दुसरीकडे लाखो रुपये खचरून रेती, सिमेंट, विटा आणलेल्या घरमालकांना मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. मात्र, परिस्थितीमुळे हा निर्णय घ्यावा लागेल.