आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवविवाहित तरुणाला पऱ्हाटीवर पोखरी शिवारात जिवंत जाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गारज - एक महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित तरुणाला पऱ्हाटीच्या फासावर जाळून मारण्यात आल्याची घटना वैजापूर तालुक्यातील पोखरी शिवारात शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पूनम सुखलाल चुंगडे (२३, रा. खापरखेडा, ता. कन्नड) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी शिऊर पोलिसांनी मृताची पत्नी रेखा चुंगडे व विजय नामक तरुणाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे.

वैजापूर तालुक्यातील वाघला येथील रेखा महेर या तरुणीशी पूनम चुंगडेचा एक एप्रिल रोजी विवाह झाला होता. घटनेच्या दिवशी गुरुवारी सायंकाळी तो सासरवाडी वाघला येथून मोटारसायकलने (एमएच २० एक्यू ८८६) खापरखेडाकडे येत होता. दरम्यान, अज्ञात व्यक्तीने त्याला गारज परिसराच्या पोखरी शिवारातील गट नं. ७२ मधील शेताच्या बांधावर असलेल्या पऱ्हाटीच्या फासावर जाळून मारले. शुक्रवारी पहाटे योगेश निकम हा शेतात पाहणी करण्यासाठी आला असता त्याला फासावर जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. याची माहिती त्याने शिऊर पोलिसांना दिली असता एपीआय धनंजय फराटेंसह पोलिस घटनास्थळी दाखल झाले. मात्र, मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान ठरले होते. तसेच मारेकऱ्याच्या शोधासाठी पोलिसांनी श्वान पथकालाही पाचारण केले. घटनास्थळाच्या १० ते १२ मीटर अंतरावर जाऊन श्वान घुटमळले. डीवायएसपी हर्ष पोतदार, गुन्हे अन्वेषण शाखेचे पीआय कांचन चाटे यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन तपासाची चक्र फरवले.

मोटारसायकल विहिरीत आढळली
पोलिसांना तपासादरम्यान मृताची मोटारसायकल (एमएच २० एक्यू ८८६) घटनास्थळाच्या परिसरातील जांबखेड शिवारातील एका विहिरीत आढळून आली. त्यामुळे मोटारसायकल कुणाची आहे, याचा शोध घेऊन मृताच्या नातेवाइकाला घटनास्थळी बोलवले. या वेळी मृताच्या हातातील कडे आणि गळ्यातील सोनसाखळीवरून नातेवाइकांनी पूनम चुंगडेचाच मृतदेह असल्याची ओळख पटवली. शिऊर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून मृताची पत्नी आणि विजय नामक तरुणाला संशयित म्हणून ताब्यात घेतले आहे. पूनम चुंगडेची हत्या करून जाळण्यात आले असावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. शिऊर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. चावडा आणि मनूर आरोग्य केंद्राचे डॉ. मुरमुरे यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केले.
बातम्या आणखी आहेत...