आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेरा टळणार, 400 किमीवरून 150 वर, नांदेड येथे नवे विभागीय आयुक्तालय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- मराठवाड्याचे महसुली विभाजन करून नांदेड येथे नवे विभागीय आयुक्तालय स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हे कार्यालय स्थापन झालेच तर हिंगोली, परभणी, नांदेड आणि लातूरचे प्रशासन हायस्पीड ट्रॅकवर येणार असून किनवट, निलंग्यासारख्या भागातील सामान्य माणसाला विभागीय कार्यालय आताच्या 400 किमीवरून 150 किमीच्या अंतरावर उपलब्ध होणार आहे.
साधारणत: विभागीय आयुक्तालयामध्ये सामान्य माणसाची प्रत्यक्षपणे कमी कामे असतात. विभागीय तालुका, जिल्हा, विभागीय आयुक्त कार्यालय ते मंत्रालय अशी फायलींची देवाणघेवाण होत असते. यामध्ये महसुली दावे आणि मुंबई पोलिस कायद्याच्या प्रकरणांमध्येच सामान्य व्यक्तींना विभागीय आयुक्त कार्यालयांमध्ये हजेरी लावावी लागते आणि ही प्रकरणे तेथे मिटली नाहीत तर मग ती मंत्रालय स्तरावर जात असतात. राज्य शासनाने ई-फायलिंग पद्धती अंगीकारल्याने महसुली प्रकरणांचा ताबडतोब निपटाराही होत असतो. शिवाय जिल्हास्तरावर सर्वच विभागप्रमुखांची आठवड्यात एकदा तरी मंत्रालयातील संबंधित कक्षप्रमुखांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगही होत असते. त्यामुळे प्रशासन गतिमान होत आहेच; परंतु कमीत कमी जिल्ह्यांसाठी एक विभागीय आयुक्त कार्यालय झाल्यास तालुका पातळीवर नियंत्रण ठेवणे सहज शक्य होणार आहे. यामुळे गतिमान प्रशासन हायस्पीड ट्रॅकवर येण्यास मदत होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठका घेणे आणि तालुका पातळीवर जाऊन नैसर्गिक आपत्ती असो की विकास योजनांचा आढावा घेणे विभागीय आयुक्तांना सहज शक्य होईल. हे काम कमीत कमी वेळात होणार असल्याने मंत्रालयाकडे फायली जाण्यालाही गती प्राप्त होईल.

बसभाडे 1 हजार; निवास, भोजनाचा भुर्दंड वेगळाच
नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील आंध्र प्रदेश, यवतमाळ जिल्ह्यांच्या नजीकची गावे औरंगाबादपासून ४५० किमी अंतरावर आहेत. अशीच गत माहूर, निलंगा, देगलूर आदी तालुक्यांमधील गावांची असून एखाद्या कामासाठी औरंगाबादला जाण्यासाठी किमान १२ तास आणि परतण्यासाठी १२ तासांचा कालावधी लागतो. काम झाले तर ठीक, नाही तर संपूर्ण आठवडाच एका कामासाठी जातो.अनेकदा तर औरंगाबाद येथेच मुक्काम करण्याशिवाय पर्याय नसतो. यामध्ये बसचे भाडे १ हजार रुपये आणि व्यक्तिगत निवास व भोजनाचा खर्च असे किमान २ हजार खर्च करावे लागतात.

हे 40 तालुके येणार कार्यकक्षेत -
हिंगोली
औंढा नागनाथ, हिंगोली, वसमत, कळमनुरी
नांदेड
कंधार, नांदेड, भोकर, लोहा, मुदखेड, उमरी, अर्धापूर, देगलूर, बिलोली, मुखेड, धर्माबाद, नायगाव, किनवट, हदगाव, माहूर, हिमायतनगर
परभणी
पालम, परभणी, गंगाखेड, सोनपेठ, सेलू, पाथरी, जिंतूर, मानवत
लातूर
औसा, लातूर, रेणापूर, उदगीर, अहमदपूर, चाकूर, जळकोट, निलंगा, देवणी, शिरूर अनंतपाळ