गेवराई - लाकडाने भरलेली बैलगाडी खड्ड्यात जाऊन उलटल्याने नवविवाहितेचा जागीच मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना गेवराई तालुक्यातील निपाणी जवळका फाट्यावर रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली.
सावित्रा गणेश जाधव (२०, रा. रांजणी) असे मृताचे नाव आहे. रविवारी सकाळी गणेश शंकर जाधव (२२ वर्षे ) व पत्नी सावित्रा जाधव यांचा सात महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. रविवारी सकाळीच हे जोडपे गढी शिवारातील त्यांच्या शेतात जळतण आणण्यासाठी बैलगाडी घेऊन गेले होते. तेथील झाडाच्या वाळलेल्या लाकडाने बैलगाडी भरून दोघे रांजणीकडे परत जात असताना निपाणी जवळका फाट्यावर बैलगाडीचे एक चाक खड्ड्यात गेल्याने बैलगाडी उलटली. यात बैलगाडीत बसलेले जोडपे लाकडाने भरलेल्या गाडीखाली दबल्या गेले. यात सविता जाधव यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक अमोल मालुसरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
पती गंभीर: निपाणी जवळका फाट्यावर नागरिकांनी बैलगाडी व लाकडे बाजूला केली. सविताचा मृतदेह लाकडाच्या ढिगाऱ्याखालून बाजूला काढला. गंभीर जखमी गणेश जाधवला बीडला हलवले आहे.