आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लातूर जिल्ह्यात नदी-नाल्यांना पूर, अनेक गावांचा रस्ता बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - काहीशी विश्रांती घेऊन पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. लातूर आणि नांदेड जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीड जिल्ह्यातही काही भागांत जोरदार पाऊस झाला. परतीच्या पावसाने पिके हातची गेली आहेत. मांजरा धरणाचे सहा दरवाजे उघडले असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री लातूर जिल्ह्यात आठ महसूल मंडळांत अतिवृष्टी होऊन सरासरी ४६.०४ मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नदी-नाल्यांना पूर आल्याने अनेक गावांचा रस्ता बंद झाला. मांजरा धरणाचे सहा दरवाजे पुन्हा उघडण्यात येऊन ६०० क्युसेकने पाणी सोडून देण्यात येत आहे. दरम्यान, अहमदपूर तालुक्यात मासे पकडण्यासाठी गेलेला तरुण वाहून गेल्याची घटना घडली.

तीन दिवसांच्या उघडिपीनंतर शुक्रवार रात्रीपासून सुरू झालेला पाऊस शनिवारी दुपारी बारापर्यंत सुरूच होता. शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ९९२.७० मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे वार्षिक टक्केवारी १२० झाली आहे. रात्री झालेला सरासरी पाऊस ४६ मिमी असला तरी रानात वापसाच नसल्याने पडलेला थेंबन््थेंब नदी, नाल्यात येऊ लागला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर्स शेती पाण्याखाली गेली असून नदी- नाले दुथडी वाहत असल्यामुळे पूर येऊन रस्त्यांवरील वाहतूक प्रभावित झाली. जळकोट तालुक्यातील बोरगाव येथील ब्रह्मदेवाचे मंदिर पाण्याखाली गेले. चेरा गावातून जाणाऱ्या तलावाच्या नाल्याचे पाणी दलित वस्तीत शिरल्याने ३० घरांचे नुकसान झाले. डोगरकोनाळी येथे तलावाच्या सांडव्याचे पाणी गावात शिरल्याने गावातील नागरिकांना रात्र मंदिरात जागून काढावी लागली. तिरुका येथे तिरू नदीवरील पुलावरून दोन फूट पाणी वाहिल्याने दोन म्हशी वाहून गेल्या. हाळदवाढवणा तलावाने पाण्याची पातळी ओलांडल्याने पुलावरून पाणी वाहिले. त्यामुळे सहा तास वाहतूक थांबवण्यात आली होती. जळकोट पाझर तलाव ओव्हरफ्लो झाल्याने फुटण्याचा धोका होता. त्यामुळे सांडवा काढून पाणी सोडून देण्यात आले. काही काळ जळकोट- उदगीर रस्ता बंद करण्यात आला होता. जळकोट तालुक्यातील डोंगरगाव येथे पुरात अडकलेल्या ११ जणांना काढण्यासाठी एनडीअारएफच्या जवानांना बोलावण्यात आले. परंतु आंधारामुळे हेलीकॅप्टर परत गेले.उदगीर तालुक्यातील हाळी व हंडरगुळी गावात पावसाचे पाणी शिरले. किनी यल्लादेवी येथील साठवण तलाव फुटला. तीन जनावरे वाहून गेली.उदगीर- लातूर मार्गावरील नळेगावजवळ नदीला पाणी आल्याने वाहतूक बंद करण्यात आली होती. शिरूरअनंतपाळ तालुक्यातील सांगवी साकोळ येथे घरणी नदीचे पाणी पात्राबाहेर पडून शेतीचे मोठे नुकसान झाले.
तरुण गेला वाहून
अहमदपूर तालुक्यातील सावरगाव (थोट) शिवारातील साठवण तलावाच्या सांडव्यातून वाहणाऱ्या पाण्यात मासेमारी करण्यासाठी गेलेला बालाजी गोविंद पांचाळ (२२) हा तरुण वाहून गेला. बालाजी व त्याचे अन्य दोन मित्र मासे पकडण्यासाठी शनिवारी सकाळी तलावावर गेले होते. या वेळी ही घटना घडली. वाहून गेलेल्या तरुणाचा रात्री शोध सुरूच होता.
मजुरांचे २६ हजार वाहून गेले
चाकूर तालुक्यातील चापोली परिसरात जोरदार पाऊस झाल्याने चापोली, आनंदवाडी, नायगाव, हिपळनेर, उंबरगा, अजनसोंडा, भाकरवाडी आदी गावांचे रस्ते नाल्याच्या पुरांमुळे बंद झाले होते. येणगेवाडी येथे वीज पडल्याने विद्युत जनित्र खाक झाला. चापोली येथे वीटभट्टीत पाणी शिरल्याने १० मजुरांच्या घरांचे नुकसान होऊन २६ हजार रुपये पाण्यात वाहून गेले.

बॅरेजेसचे दरवाजे उघडले
शनिवारी दुपारी साडेबारा वाजता लातूर तालुक्यातील तावरजा मध्यम प्रकल्पाचे पाच स्वयंचलित, तर रेणा मध्यम प्रकल्पाची चार दारे पाच सेंमीने वर उचलण्यात आली आहेत. मांजरा आणि तेरणा नदीवरील तगरखेडा, गुंजगरगा, औराद, वांजरखेडा बॅरेजेसची सर्व, तर मदनसुरी एक, लिंबाळा सहा, तर किल्लारी बंधाऱ्यावरील चार दरवाजे उघडण्यात आले आहेत. तेरणा-मांजरा नदीचे संगमपात्र दुथडी भरून वाहत असल्याने दोन्ही नद्यांचे अतिरिक्त पाणी कर्नाटकात सोडून देण्यात येत आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा, लातूरमधील पावसाचे PHOTOS
बातम्या आणखी आहेत...