आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदाच 101 मुलींचे नामकरण; पैंजण, पाळण्याची मिळेल भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - स्त्री जन्माच्या बाबतीत देशभरात चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यात  स्त्री जन्माच्या स्वागतासाठी जनजागृती करून बेटी बचाओचा संदेश देण्यात येत अाहे. बीडमध्ये ३१ डिसेंबरपासून सुरू असलेल्या स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १३ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात मंगळवारी १०१ कन्यारत्नांचा नामकरण सोहळा करण्यात येणार अाहे. या मुलींना पैंजण व पाळण्याची भेट देण्यात येणार आहे.  या सोहळ्यात मुस्लिम कुटुंबानेही नावनोंदणी केली असून त्यांच्याही मुलीचे बारसे या सोहळ्यात होणार आहे हे विशेष.  
स्त्री भ्रूणहत्येमुळे देशभरात चर्चेत आलेल्या बीड जिल्ह्यातील मुलगी नको ही मानसिकता पुसण्यासाठी शासनासह विविध सामाजिक संस्था विविध उपक्रम राबवून जनजागृती करत आहेत. याचा परिणाम म्हणून स्त्री जन्मदरात देशात रेडझोनमध्ये गेलेल्या शिरूर तालुका रेडझोनबाहेर अाला आहे. याच साखळीत आता स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानद्वारे आयोजित राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात १०१ कन्यारत्नांचा एकत्रित नामकरण सोहळा मंगळवारी होणार आहे. ऑक्टोबर २०१६ ते डिसेंबर २०१६ या तीन महिन्यात जन्मलेल्या मुलींचे एकत्रित नामकरण होणार आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, नामकरण झाल्यानंतर खटोड प्रतिष्ठानच्या वतीने मुलींना पैंजण आणि पाळण्याची भेट देण्यात येणार असून मुलींच्या मातांनाही साडीचोळी देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
 
संगीतमय बारसे  
स्त्री जन्माचे स्वागत करणाऱ्या या सोहळ्यासाठी विशेष संगीत रजनीचे आयोजनही करण्यात आले असून अहमदनगर येथील श्रद्धा इव्हेंट या ग्रुपकडून संगीत रजनी सादर होऊन संगीतमय बारसे होणार आहे.  

देश वाचेल  
-मुलगी वाचली तर देश वाचेल हा संदेश देऊन स्त्री जन्माच्या बाबतीत नकारात्मकता जाण्यासाठी व स्त्री जन्माच्या स्वागतासाठी हा उपक्रम राबवण्यात आला आणि याला मोठा प्रतिसादही मिळाला.  
गौतम खटोड, संयोजक 
बातम्या आणखी आहेत...