आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवन्यामध्ये 130 हेक्टरवर कांदा लागवड; 40 हजारांचा भाव, अधिक भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना - मिरची उत्पादनाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील शिवना परिसरात कांदा पीक (सीड्स) घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. भरघोस उत्पादनासह हमी भावात कांद्याचे बियाणे विकले जात असल्याने यंदा परिसरात १३० हेक्टरांवर विक्रमी कांद्याची लागवड झाली आहे. चाळीस हजारांच्या हमी भावापेक्षा अधिक भाव मिळण्याची शेतकऱ्यांना आशा आहे.  

शिवन्यासह परिसरात प्रामुख्याने कापूस, मका व सोयाबीनचे पीक अधिकाधिक घेतले जाते. मिरचीच्या लागवड क्षेत्रातही मंडळात विक्रमी वाढ होत आहे. ठिबक सिंचनाचा वापर व नियोजनबद्ध शेती करताना गेल्या काळात या पारंपरिक पिकाला फाटा देत शेतकऱ्यांनी कांदा (सीड्स) उत्पादनाकडे आपला मोर्चा वळविला आहे. पाण्याचा काटकसरीने वापर करून शिवन्यासह, खुपटा, जळकीबाजार, नाटवी, धोत्रा, वाघेरा आदी भागांत कांद्याचे पीक चांगलेच बहरले आहे. पाच वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच दुष्काळाने पाठ सोडली त्यामुळे कापूस, मका, सोयाबीन व मिरची उत्पादनातून शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला. पाण्याचा 
साठा ठेवलेल्या शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. आताचा चाळीस हजारांचा भाव कांदा सीड्स विकत घेणाऱ्या कंपन्यांनी निश्चित केला असला तरी कंपन्यांच्या शर्थीशी न बांधलेल्या शेतकऱ्यांना याहीपेक्षा अधिक मिळण्याची आशा आहे.  
 
पाण्याच्या नियोजनाने २५० हेक्टरांपर्यंत मिरची लागवड  
- पाण्याच्या नियोजनामुळे शिवन्यासह परिसरात मिरची लागवड क्षेत्र २५० हेक्टरपर्यंत गेले. एप्रिल व मे महिन्यात उन्हाळी मिरचीची लागवड केली जाते, तर कांद्याची नोव्हेंबर ते डिसेंबरला लागवड होत असते. मार्च ते एप्रिल महिन्यात ते पीक हाती पडते. यंदा पाऊसमान चांगला असल्याने परिसरात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. 
-प्रवीण डांगरे, कृषी सहायक, शिवना.