आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एवढ्या पैशात तर 50 गावांची कायमस्वरूपी टंचाई मिटेल, टंचाई आराखड्यात पैठणसाठी 7.25 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 पैठण - मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण असलेले जायकवाडी पैठण तालुक्यात असूनदेखील मराठवाड्यातील सर्वाधिक टँकरची संख्या दरवर्षी पैठण तालुक्यात असते. यंदा अद्याप टँकर सुरू झाले नसले तरी कृती आराखड्याच्या माध्यमातून पैठणमध्ये पुन्हा टँकरवर कोटींचा खर्च करण्याची तयारी प्रशासनाने चालवल्याची बाब समोर आली आहे. टंचाई कृती आराखड्यात पैठणसाठी सर्वाधिक ७ कोटी २८ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात असला असून यात तालुक्यातील सुमारे ५० गावांची कायमस्वरूपी टंचाई मिटू शकते. यावर प्रशासनाने भर द्यावा, अशी मागणी समोर येत आहे. 

जिल्हा प्रशासनाकडे  जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील उन्हाळ्यातील संभाव्य पाणीटंचाईवर किती खर्च अपेक्षित आहे त्याचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. यात पैठणसाठी ७.२८ कोटींचा समावेश असून टँकर लाॅबीला पोसण्यासाठी हा कृती आराखडा असल्याचे दिसून येत आहे. पैठणमध्ये दरवर्षी उन्हाळ्यात शंभरच्या वर टँकर सुरू असतात. मागील दुष्काळात तर हा आकडा दोनशेच्या घरात गेला होता. यातून निम्म्या गावात तर टँकरच्या केवळ कागदावर खेपा दाखवत कोटींचा घोटाळा झाल्याची बाब “दिव्य मराठी’ने उघड केली होती.  मात्र, हा घोटाळा राजकीय नेत्यांनी दाबल्याचे समोर आले होते.  त्यानंतर पैठणमध्ये चांगला पाऊस झाल्याने आता टँकरची गरज लागणार नाही असे वाटले. मात्र, प्रशासनाने जो कृती आराखडा तयार केला आहे, तो पाहता हा कृती आराखडा म्हणजे टँकर लाॅबीला पोसण्याचा प्रकार असल्याचे समोर येत आहे. 

टंचाईवर अधिकारी - नेते गब्बर :  
पैठण तालुक्यातील आडूळ, बालानगर हा भाग वगळता इतर ठिकाणी पाणीटंचाई तशी कमी भासते. मात्र, टँकर सुरू केले तर दोन खेपा दाखवून एक खेपेची रक्कम आपल्या खिशात असे प्रकार पैठणमध्ये होत असल्याचे दिसते. यातून गावागावांतील नेतेमंडळींनी आपलेच टँकर पाण्यावर लावत गावात कृत्रिम  पाणीटंचाई दाखवत पाण्याचा धंदा सुरू केला. यातून काही अधिकारी -नेते मंडळी गब्बर झाली. मात्र, गावाची तहान काही भागली नाही.
 
पाणी असलेल्या गोदावरी नदीपट्ट्यातच टँकरवर दाखवला जातोय खर्च
गोदावरी पट्ट्यात टँकरवर खर्च 
 पैठणमध्ये दरवर्षी टँकरवर कोटींचा खर्च करण्यात येतो. यात गंभीर बाब म्हणजे ज्या भागात टँकर सुरू राहिले त्यातील गोदावरी नदीपात्राच्या स्थानिक पदाधिकारी ते अधिकारी अशा चेनमुळे दरवर्षी कृत्रिम टंचाई  भासते. 
 
टंचाई मिटेल 
यंदाच्या उन्हाळ्यासाठी पैठणच्या कृती आराखड्यात १०६ गावे व ११ वाड्यांचा समावेश आहे. संभाव्य टंचाईमध्ये समावेश आहे. यावर ७ कोटी २८ लाखांचा खर्च अपेक्षित करण्यात आला आहे.  हा खर्च दरवर्षी याच स्वरूपात होतो. हा खर्च पाहता दरवर्षी पंधरा गावांची पाणीटंचाई कायमची दूर होईल.  
 
टँकर सुरू होतील
पैठणमध्ये सध्या तरी टँकरची मागणी नाही. मात्र, मार्च महिन्यात टँकर सुरू होतील. सध्या कृती आराखडा तयार करण्यात आला असून तो केवळ अपेक्षित खर्च धरला जातो. तेवढा लागतोच असे नाही. 
- भास्कर कुलकर्णी, 
गटविकास अधिकारी, पैठण. 
 
लॉबीला अभय
पैठणमध्ये दरवर्षी टँकर लाॅबीला पोसण्यासाठी कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करून टँकर सुरू केले जातात. यातून कोटीचा भ्रष्टाचार होतो, मागील टँकरची चौकशी केल्यास कोटींचा भ्रष्टाचार समोर येईल. कृती आराखडा पाहता टँकर लाॅबीला पोसण्यासाठी टँकर सुरू करण्याचा प्रकार दिसतो.
- तुषार शिसोदे, तालुकाध्यक्ष, भाजप.
 
कोल्ही प्रकल्पातून पाण्याचा अपव्यय
वैजापूर - जिल्हा प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाईचा मुकाबला करण्यासाठी आरक्षित केलेल्या कोल्ही मध्यम प्रकल्पातून नांदूर-मधमेश्वर सिंचन विभागाच्या गलथान कारभारामुळे पाणी गळती सुरू झाली आहे. प्रकल्पातून लाभक्षेत्रातील गावांना पाणी आवर्तन सोडण्यासाठी उघडलेल्या दरवाजांपैकी एक दरवाजा बंद होत नसल्यामुळे पाणीसाठ्याचा अपव्यय प्रकल्पातून होत आहे.

 नांदूर-मधमेश्वर सिंचन विभागाच्या अखत्यारीत असलेल्या कोल्ही मध्यम प्रकल्प क्षेत्रात गेल्या वर्षात दमदार पाऊसमानामुळे प्रकल्पात सात वर्षांनंतर प्रथमच शंभर टक्के जलसाठा झाला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास कदम यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबरमध्ये पार पडलेल्या पाणीटंचाई नियोजन बैठकीत संभाव्य जलसंकटाचा सामना करण्यासाठी या प्रकल्पातील ४० टक्के पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, नांदूर-मधमेश्वर सिंचन विभागाने कोल्ही धरणातून लाभक्षेत्रातील गावांना रब्बी सिंचन हंगामासाठी सुदामवाडी, बोरसर, कोल्ही या तीन गावांना १५ दिवसांचे पाणी आवर्तन सोडले होते. ११ फेब्रुवारीला आवर्तन बंद करण्यात आल्यानंतर धरणाचे एक गेट काही केल्या बंद होत नव्हते. प्रयत्नांची परकाष्ठा करून सिंचन विभागाने वाळू भरलेल्या गोणी लावून वाहून जाणारे पाणी अडविण्याचा केविलवाणा प्रयत्न अपयशी ठरला. 

दरम्यान, नादुरुस्त गेट दुरुस्त करण्यासाठी यांत्रिकी विभागाला येथे बोलविण्याची हालचाल सुरू करण्यात आली आहे. कोल्ही मध्यम प्रकल्पात आजमितीस ५७ टक्के पाणीसाठा असून शिऊर, खंडाळा या मोठ्या गावांसह सात गावांची पाणीपुरवठा योजना प्रकल्पाच्या पाण्यातून तहान भागविली जाते. दरम्यान, गेट नादुरुस्त झाल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. 
 
किरकोळ प्रकार आहे....  
कार्यकारी अभियंता एस. जी. शिर्के म्हणाले, गेल्या सात वर्षांपासून धरण कोरडेठाक पडले होते. या वर्षात प्रकल्पात पाणी आले. गेट जॅम झाल्याची कबुली देत तातडीने दुरुस्ती केली जाईल. किरकोळ स्वरुपात पाणी वाहत आहे.  हा किरकोळ प्रकार असून उपाययोजन करू . 
 
विभाग जबाबदार...  
कोल्ही धरणातून गेट बिघडल्यामुळे पाण्याच्या होणाऱ्या नासाडीला नांमका विभागातील अधिकारी, कर्मचारी जबाबदार असल्याचा आरोप  सरपंच तथा भाजपच्या किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष कैलास पवार यांनी केला आहे.
बातम्या आणखी आहेत...