आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डी-शेगावच्या धर्तीवर तुळजापुरात सुविधा का नाहीत; आता सुधारणा घडवून आणू: जिल्हाधिकारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुळजापूर- तब्बल वर्षभरानंतर श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानची बैठक शुक्रवारी (दि.२६) जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या बैठकीत नूतन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांना प्रश्न केले.
 
ते म्हणाले, शिर्डी-शेगावच्या धर्तीवर आपणही भाविकांना सुविधा का देऊ शकत नाही. त्यानंतर त्यांनी सुविधा वाढविण्यावर भर देण्याचे आश्वस्त केले. तसेच मंदिरात सुसूत्रता आणण्यासाठी उपाययोजनाही सुचविल्या. तत्पूर्वी तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी अनेक कामांबाबत नाराजी व्यक्त केली तसेच कामांच्या चौकशीची मागणी केली. 

बैठकी दरम्यान नूतन जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांनी काही प्रश्न कुतूहलाने तर काही भाविकांच्या मनाला पडणारे प्रश्न विश्वस्तांना केले. ते म्हणाले, शिर्डी-शेगावमध्ये भाविकांचा प्रचंड ओघ असतो. तिथे भाविकांना पुरेशा सुविधाही मिळतात. मात्र, तुळजापूरमध्ये अशा सुविधा देण्यात काय अडचण आहे. मंदिर प्रशासनाने अशा कामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. त्यासाठी मंदिर प्रशासनाप्रमाणेच तुळजापूरच्या पुजाऱ्यांनी, व्यापाऱ्यांनीही प्रयत्न करावेत. भाविकांचा ओघ वाढला तर तुळजापूरच्या विकासाला गती मिळेल. भाविकांनी देणगी स्वरूपात तुळजाभवानी चरणी अर्पण केलेल्या रकमेचे आकडे, भाविकांना समजण्यासाठी ऑनलाइन डिस्प्ले बोर्डवर लावावेत, असे सांगितले. 
 
जीवन प्राधिकरणच्या अधिकाऱ्याला धारेवर धरले; कामाच्या चौकशीचे आदेश 
तुळजापूरतीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणच्या पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीला प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिाकरी राधाकृष्ण गमे, आमदार मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष पंडितराव जगदाळे, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, अप्पासाहेब पाटील, तहसीलदार आदी उपस्थित होते. 

यावेळी तुळजापुरातील भुयारी गटार योजनेची चौकशी तांत्रिक समिती नेमून करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. या बैठकीत अंतर्गत भुयारी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे तसेच चुकीच्या पध्दतीने झाल्याचे सांगत पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अभियंत्याला धारवेर धरले होते. भुयारी गटार योजनेच्या कामात बट्ट्याबोळ झाल्याचा आरोप करीत आमदार मधुकरराव चव्हाण, नगराध्यक्ष जगदाळे यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता आर. बी. सूर्यवंशी यांना धारेवर धरले.

भुयारी गटार अनेक ठिकाणी चोकअप होत असून, चेंबरचे कामही खालीवर करण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी सात दिवसांत तांत्रिक समिती नेमून गटार योजनेची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले. तब्बल वर्षानंतर होत असलेल्या या बैठकीत सदस्य बोरगावकर यांनी जिजामाता विद्यालय यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाकडे जाण्यासाठी रस्ता करण्याची मागणी लावून धरली तर अप्पासाहेब पाटील यांनी मंकावती कंुडाची सफाई करण्याची मागणी केली. 
 
या कामांना दिली मंजुरी 
तुळजापूर (खुर्द) येथे १ कोटी १० लाख रुपयांचे भक्त निवास बांधणे, शहरातील घाटशीळ रोड ईदगाह मैदान, खुर्द, आराधवाडी, शुक्रवार पेठ या ठिकाणी सुलभ शौचालय बांधणे, भवानी रोड, शुक्रवार पेठ, मार्गावर पथदिवे बसविणे, भक्त निवासात फर्निचर, नळदुर्ग आणि उस्मानाबाद रस्त्याच्या बाजूला सर्व्हिस रस्ता करणे. 

आता बैठक दीड महिन्यात 
दरम्यान,गेल्या काही वर्षापासून विकास प्राधिकरणाची बैठक वर्ष-वर्ष होत नसल्याने अनेक कामे रखडली होती. गेल्यावर्षी (२०१६) १३ मे रोजी तर त्यापूर्वी १८ मे २०१५ रोजी प्राधिकरणची बैठक झाली होती. मात्र, नुतन जिल्हाधिकारी गमे यांनी यापुढे प्राधिकरणची बैठक दीड महिन्याच्या आत घेण्याचा मनोदय यावेळी व्यक्त केला. 

पापनाश तलाव बीओटीवर 
प्राधिकरणअंतर्गतविकसित करण्यात आलेल्या पापनाश तलावसह धर्मिक ग्रंथालय बीओटीवर चालविण्यासाठी देण्याचा निर्णय प्राधिकरणच्या बैठकीत घेण्यात आला. पापनाश तलाव येथे डॅश कार, रेल्वे, संगीत कारंजे अादी मनोरंजनाची साधने संबंधित एजन्सीने बसवून त्याचा खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला.तसेच पापनाश तलावाचे काम रखडल्याबद्दल कंत्राटदाराला दंड आकारण्याचा निर्णयही घेण्यात आला. 
बातम्या आणखी आहेत...