रायगड - कामाख्याहून पुण्याला जात असलेली रेल्वे रायगड स्थानकावर न थांबल्याने एका महिलेने धावत्या रेल्वेतून
आपल्या दीड वर्ष वयाच्या मुलीस खाली फेकले आणि स्वत: उतरण्यासाठी उडी घेतली. या दुर्घटनेत मुलगी तर वाचली, पण महिला दगावली. सदर महिला काेसमपाली या माहेरगावास जात होती. ती बृजराजनगर येथून या एक्सप्रेसमध्ये बसली. अपघात घडल्यानंतर प्रवाशांनी साखळी ओढून रेल्वे थांबवली आणि त्या महिलेसोबत असलेल्या तीन वर्षे वयाच्या मुलास खाली उतरवले. प्रवाशांनी सांगितले, कॉशन ऑर्डरनुसार कामाख्या-पुणे रेल्वे काही वेळ बृजराजनगरला थांबली होती. रुक्मिणी मेहर सणासाठी माहेरी जाण्यासाठी बृजराजनगरला रायगडकडे जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत होती. कामाख्या एक्स्प्रेसला रायगड थांबा नाही, याची माहिती तिला नव्हती. ती आपल्या मुला-मुलीसह या रेल्वेत बसली. रायगड स्थानक आल्यानंतर ती गेटजवळ थांबली होती. रेल्वे प्लॅटफॉर्मवर थांबली नाही. हे पाहून तिने घाईघाईत बॅग व कडेवरील दीड वर्षाच्या मुलीला प्लॅटफॉर्मवर फेकले आणि तिने उडी मारली. त्या महिलेचे डोके रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेल्या रुळावर आपटले. डोके आपटल्याने महिलेने जोरदार किंकाळी फोडली. तिचा आवाज ऐकून स्वच्छता कर्मचारी आणि कँटीनमधील कर्मचारी तिकडे धावले. तोपर्यंत ती महिला मृत्युमुखी पडली होती. तर तिच्या मृतदेहापासून सुमारे ५० मीटर अंतरावर तिची मुलगी रडत पडलेली हाेती. या मुलीच्या उजव्या पायास मार लागला आहे.
सणासाठी भाऊ वाट पाहत होता, पण तिला मृत्यूने गाठले
मोठा भाऊ हरेराम यांनी सांगितले, माझी बहीण रुक्मिणी दोन मुलांसह माहेरी सणासाठी रायगडला येणार होती; पण तिला मृत्यूने गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या भावासोबत त्या मुलांना रुग्णालयात पाठवण्यात आले होते. मुलीच्या उजव्या पायास गंभीर जखम झाली आहे.