पाचाेरा : सावखेडा (जि. जळगाव) बुद्रुक येथे भैरवनाथाच्या यात्रेत नवस फेडण्यासाठी जाणाऱ्या शेंदुर्णी (ता. जामनेर) येथील भाविकांचा टेम्पो उलटल्याने झालेल्या अपघातात तीन ठार तर ४० जण जखमी झाले. रविवारी वरखेडीत हा अपघात झाला.
रतन शिवलाल बारी (५०), मंगला रतीलाल बारी (३५), कडुबा दामू लाेहार (६५, शेंदुर्णी) अशी मृतांची नावे आहेत, तर ४० जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सावखेडा बुद्रुक येथे भैरवनाथ महाराजांची पाैष महिन्यातल्या चारही रविवारी यात्रा भरते. रविवारी यात्रा असल्याने शेंदुर्णी येथील शालिक तुकाराम बारी यांनी नवसाचा कार्यक्रम ठेवला हाेता. यासाठी बऱ्हाणपूर, जळगाव, साेयगाव, शेंदुर्णी येथील नातेवाईक बारी कुटुंबीयांकडे अाले हाेते. सावखेडा येथे जाण्यासाठी सर्वजण सकाळी ९.३० वाजता निघाले असता चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो वरखेडी येथे उलटला. यात वाहनचालक रतन बारी जागीच ठार झाले, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. जखमींमध्ये लहान मुले अधिक आहेत.
मदतीसाठी सरसावले हात : घटनास्थळी वाहन बाजूला करून जखमींना उपचारासाठी हलवण्याकरिता अनेक हात सरसावले. लाेकांनी खासगी वाहनाने जखमींना रुग्णालयात दाखल केले, परंतु ग्रामीण रुग्णालयात एकही डाॅक्टर नव्हते. काहींनी डाॅक्टरांना माेबाइल केला असता त्यांनी ताे उचलला नाही. त्यामुळे शहरातील खासगी डाॅक्टर डाॅ. प्रवीण माळी, डाॅ. दिनेश साेनार, डाॅ.चारूदत्त खानाेरे, डाॅ.भूषण मगर यांनी रुग्णालयात येऊन उपचार सुरू केले.
नंतर शासकीय रुग्णालयातील डाॅक्टर हजर झाले. अामदार किशाेर पाटील, माजी अामदार दिलीप वाघ, पाेलिस उपअधीक्षक केशव पाताेंड, तहसीलदार दीपक पाटील अादी घटनास्थळी दाखल झाले.