कसबे सुकेणे- मुंबई-अाग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर माेटारसायकल व अारामबस यांच्यात शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात कसबे सुकेणे येथील तीन युवकांचा जागी मृत्यू झाला. हे तिघेही चांगले क्रिकेटपटू असल्याने गावावर शोककळा पसरली.
पिंपळगाव बसवंत येथील फूड कंपनीत कामावर जात असताना शुक्रवारी सकाळी आरामबस व दुचाकीचा अपघात झाला. यात बसमधील सचिन वसंत मुंजे, योगेश मंगळू पवार, दत्ता अशोक सूर्यवंशी हे तीन युवक जागीच मृत्यूमुखी पडले. ते कसबे सुकेणेहून रहिवाशी हाेते. गावात नुकत्याच झालेल्या क्रिकेट स्पर्धेत या तिघांनी उत्कृष्ट खेळी करीत चषक पटकाविला होता.
मृत योगेश पवार हा अष्टपैलू क्रिकेट खेळाडू होता. उत्कृष्ट गोलंदाजही होता. सुकेणेकर युवक योगेश यास ‘लारा’ या नावाने संबोधत. मात्र नियतीने सुकेणेकरांचा हा लारा ही हिरावून नेल्याने युवकांनी हळहळ व्यक्त केली. योगेश यास सहा महिन्याची मुलगी अाहे. त्याच्या निधनामुळे पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दत्ता सूर्यवंशी चॅलेंजर ग्रुपचा ओपनर बॅट्समन होता. यावर्षी त्याच्या विवाहाची तयारीही चालू हाेती. तर सचिन मुंजे हा कुटूंबातील मोठा मुलगा असून अविवाहित हाेता. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार अाहे.