आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद जवानाच्या मुलीच्या नावे 3 लाखांची मुदतठेव, महसूल कर्मचाऱ्यांनी घेतला पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 धारूर- जम्मू-काश्मीरच्या सोनमर्गमध्ये हिमस्खलनात शहीद झालेल्या धारूर तालुक्यातील गांजपूर येथील जवान विकास समुद्रे  यांच्या नऊ महिन्यांच्या मुलीसाठी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तीन लाख बारा हजार रुपयांचा निधी गोळा केला. 
 
माणुसकी जागवत या कर्मचाऱ्यांनी येथीलच भारतीय स्टेट बँकेत मुदतठेव केली आहे. या ठेवीचा बाँड जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते बुधवारी शहिदाच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला तेव्हा कुटुंबीयांचे डोळे पाणावले.  
 
गांजपूर येथील जवान विकास समुद्रे हे  २५ जानेवारी २०१७ रोजी जम्मू-काश्मीर मधील सोनमर्ग येथील हिमस्खलनात शहीद झाले होते. त्यांच्या पार्थिवावर गांजपूर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.  विकास यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाची प्रेरणा जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचारी  यांनी घेतली. 
 
या शहिदाच्या  कुटुंबाच्या मदतीसाठी  महसूल कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने  निधी जमवत तो कुटुंबाला देण्याचा  निर्णय घेतला. धारूर तहसील कार्यालयातील अधिकारी -कर्मचाऱ्यांनी एक लाख बारा हजार रुपये निधी जमा केला. त्यानंतर जिल्हाभरातून दोन लाख रुपये जमा झाले. असे एकूण तीन लाख बारा हजार रुपये जमा झाले. प्रत्येकाने  खारीचा वाटा उचलला.
 
संकलित झालेला निधी  नगदी स्वरूपात न देता या शहीद जवानाची नऊ महिन्यांची चिमुकली दिव्या  समुद्रे हिच्या शिक्षण व भावी आयुष्यासाठी येथील भारतीय स्टेट बँकेत मुदतठेव योजनेत रक्कम ठेवण्यात आली. ही  रक्कम  मुलगी अठरा वर्षांची होईपर्यंत बँकेतून काढता येणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. 
 
दरम्यान, बुधवारी गांजपूर येथे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या हस्ते शहीद सैनिकाची पत्नी प्रतिभा यांच्याकडे बाँड सुपूर्द करण्यात आला. या वेळी तहसीलदार राजाभाऊ कदम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी टी. के. नवले, नायब तहसीलदार सुहास हजारे उपस्थित होते. या वेळी  जिल्हाधिकाऱ्यांनी समुद्रे कुटुंबाची अास्थेवाईक विचारपूस केली.  
 
भावावर जबाबदारी  
शहीद विकास समुद्रे यांच्या पश्चात कुटुंबात आई जनाबाई, पत्नी प्रतिभा, भाऊ परमेश्वर, दोन बहिणी, लहान मुलगी दिव्या असा परिवार आहे. या कुटुंबाला शेती नसल्याने आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. परमेश्वर हा अविवाहित असून त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे.
बातम्या आणखी आहेत...