आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या गळ्याला कर्जाचा फास कायम!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - तालुक्यातील सुमारे ३ हजार शेतकरी मागील वर्षभरापासून युती सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असल्याचे चित्र समोर आले आहे. कर्जमाफीत आतापर्यंत केवळ ६८५ जण पात्र ठरले आहेत. शहरातील दोन खासगी सावकारांनी तालुक्यातील एकूण ३ हजार ६८३ शेतकऱ्यांना कर्ज वाटप केलेले आहे. सुरुवातीपासूनच मोठा गाजावाजा झालेल्या या कर्जमाफीचा फायदा मात्र म्हणावा तितक्या कर्जधारकांना न झाल्याने शेतकऱ्यांत शासनाविरोधात नाराजी पसरत आहे, तर दुसरीकडे वर्षभरापूर्वी घोषणा झालेल्या या कर्जमाफीत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांची अद्ययावत माहितीच सहकार विभागाकडे उपलब्ध होऊ शकलेली नाही. येथील सहकार विभागाने प्रलंबित असलेल्या ३ हजार कर्जधारकांची तलाठ्यांमार्फत पडताळणी सुरू केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील वर्षीच्या हिवाळी अधिवेशनात विदर्भ आणि मराठवाड्यातील सावकारी कर्जाने पिचलेल्या शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखवत तब्बल १७१ कोटी रुपयांच्या कर्जमाफी पॅकेजची घोषणा केली होती. त्यानुसार विदर्भ व मराठवाड्यातील २.२३ लाख कर्जधारक शेतकऱ्यांचे अंदाजे सुमारे १५६ कोटी रुपयांचे कर्ज व त्यावरील व्याजापोटी १५ कोटी रुपये अशी एकूण १७१ कोटी रुपयांची रक्कम शासनाने भरण्याची जबाबदारी उचलली होती. शासनाने कर्जदार हा सातबाराधारक शेतकरी असावा अथवा कुटुंबातील सदस्य असावा, तो परवानाधारक सावकाराच्या कार्यक्षेत्रातील असावा. तसेच कर्जदार हा पगारदार व्यक्ती अथवा दुकानदार नसावा हे निकष जाहीर केले होते. या योजनेत ३० नोव्हेंबर २०१४ अखेरचे थकीत कर्ज व ३० जून २०१५ पर्यंतचे व्याज यात पात्र ठरणार होते. या कर्जधारक शेतकऱ्यांचे १ कोटी ६ लाख ३७ हजार रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे, तर दुसरीकडे यातील सुमारे ३ हजार शेतकरी वर्षभरापासून कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. या शेतकऱ्यांच्या डोक्यावर २ कोटी ६५ लाख ९० हजार रुपयांच्या कर्जाचा डोंगर आहे. दरम्यान, या प्रतीक्षेत असलेल्या कर्जधारकांची तलाठ्यामार्फत फेरपडताळणी करण्यात येत आहे. हे कर्जधारक हे सातबाराधारक आहेत का, ते निवृत्तिवेतनधारक आहेत का, पगारदार आहेत का, आदी बाबींची माहिती मागवण्यात येत आहे. यातील ज्या कर्जधारकांकडे शेतजमीन नाही तसेच ज्यांनी आपले कर्ज भरले आहे, त्यांना अपात्र ठरवण्यात येणार आहे. ३ हजार शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत.
साडेतीन कोटींचे कर्ज माफ
शहरात उमेश संचेती व किशोर कुलथे या दोन खासगी सावकारांनी तालुक्यातील एकूण १३६ गावांतील ३ हजार ६८३ शेतकऱ्यांना ३ कोटी ५२ लाख ९० हजार रुपयांच्या कर्जाचे वाटप केल्याचा अहवाल सहायक निबंधक कार्यालयाने सादर केला होता. यात शासनाने दिलेल्या सूचनेनुसार १२ जून रोजी शेतकरी कर्जमुक्ती करण्याची डेडलाइन दिली होती. त्यात नंतर वेळोवेळी मुदतवाढ देण्यात आली; मात्र अद्याप या कर्जमाफीत वैजापूर तालुक्यातील केवळ ६८५ कर्जधारक शेतकरीच पात्र ठरले आहे.
बातम्या आणखी आहेत...