आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्कम 11 डिसेंबरपर्यंत द्या, अन्यथा अधिवेशन रोखणार; अजित पवार यांचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- भाजप सरकारने गल्ली ते  दिल्ली कोणतीही विकासकामे न करता शेतकरी व जनतेला आश्वासनांची खैरात देण्याचेच काम चालवले आहे. शेतकऱ्यांना जुजबी कर्जमाफी तर दिली. मात्र, त्याही रकमेसाठी तारीख पे तारीख देण्याचेच काम सुरू आहे. त्यामुळे येत्या ११ डिसेंबरपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात  जमा न झाल्यास हिवाळी अधिवेशनच चालू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी गुरुवारी (दि. १६) जिंतुरात दिला.  

जिंतूरचे आमदार विजय भांबळे यांच्या पुढाकाराने सेलू-जिंतूर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी, शेतमजुरांचा मोर्चा गुरुवारी दुपारी आमदार कार्यालयावरून दादा शरीफ चौक मार्गे धडक तहसील कार्यालयावर  धडकला. त्याठिकाणी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी आमदार भांबळे, आमदार बाबाजानी,  रामराव वडकुते, माजी मंत्री गणेशराव दुधगावकर, माजी मंत्री फौजिया खान, माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उज्वला राठोड आदींची प्रमुख उपस्थिती होती.  


या वेळी झालेल्या सभेत पवार म्हणाले, भाजप सरकार शेतकरी व जनतेला आश्वासनांची खैरात देत आहे. या सरकारने विजेचे कनेक्शन तोडा असा आदेश दिल्याने शेतकरी भयानक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर कोसळला आहे. परंतु, शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफ करू व त्यांच्या खात्यात कर्जाची रक्कम टाकू, असे राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले होते. परंतु, तारखेवर तारखा देत असल्याने शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचेच काम सुरू असून हुकूमशाही चालवल्याचा आरोप करत ११ डिसेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करा अन्यथा हिवाळी अधिवेशन चालवू देणार नाही, असाही इशारा पवार यांनी दिला. शेतकऱ्याच्या शेतातील विजेचे कनेक्शन तोडले तर याद राखा. संपूर्ण राज्यात आंदोलन करू. सातारा बँकेतून शेतकऱ्यांना झीरो टक्के व्याजदर कर्ज देतो परंतु परभणी जिल्हा बँक मातीत घालायचे काम ज्यांनी केले त्यांना जेलची हवा खावी लागेल, असेही पवार म्हणाले. 

 

सरकारने फक्त कर्जाचा डोंगर वाढवला  
केंद्रात मोदी, राज्यात फडणवीसांनी गरीब व कष्टकरी शेतकऱ्यांना जनधन खाते उघडण्यास लावले व त्यांच्या खात्यावर रक्कम टाकू, अशी आश्वासने दिली. परंतु त्या आश्वासनाची आजपर्यंत काय केले, असा सवालही त्यांनी केला. नोटा बंदी करून काय साध्य केले. जीएसटी लागू करून जनतेचे कंबरडे मोडले. शासन विकास कामे न करता सरकारच्या डोक्यावर करोडो रुपये कर्ज काढून ठेवले, असाही आरोप पवार यांनी या वेळी केला.

बातम्या आणखी आहेत...