आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू धर्मातच भोंदूबाबा, अंधश्रद्धेचे प्रमाण जास्त; शाम मानव यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- मला विचारले जाते, की तुम्ही हिंदू धर्मावरच जास्त  बोलता, टीका करता. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की हिंदू धर्मातच जास्त भोंदूबाबा आणि अंधश्रद्धा आहे आणि त्यामुळेच मला त्यावर जास्त बोलावे लागते, असे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे शाम मानव यांनी येथे बोलताना सांगितले. 

  सोमवारी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर प्रा. शाम मानव यांचे  “वृक्ष तिथे छाया आणि बुवा तिथे  बाया’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. त्यानिमित्त ते आज येथे आले असता, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. 

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की वृक्ष तेथे छाया आणि बुवा तिथे बाया हे समीकरण झाले आहे. त्यामुळे आपण याच विषयावर बोलणार असून त्याच विषयावर काम करीत आहोत. असले भोंदू बाबा आढळले तर थेट पोलिसांना बाबाविरुद्ध थेट पुरावा द्या आणि गुन्हा दाखल करा, असे आम्ही गेल्या कित्येक वर्षांपासून सांगत आहोत. परंतु समाज काही मनावर घेत नाही. परंतु समाधानाची बाब म्हणजे आता काही प्रमाणात का होईना, समाज पुढे येऊन विरोध करू लागला आहे, असे मानव यांनी सांगितले. अखिल भारतीय साहित्य संमेलन हे हिवरा आश्रमात घेणे   चुकीचे होते. त्यासाठीच आपण त्याला विरोध केला. यापूर्वीच आम्ही त्या आश्रमाच्या बाबाची पोलखोल केली होती. याबाबत राज्यभर चर्चा होऊनही, मराठी साहित्य महामंडळाने तेथे संमेलन घेण्याचे ठरवले होते. ही बाब आम्हाला पटली नाही आणि आम्ही ताबडतोब विरोध केला आणि नंतर आमच्यामुळेच येथील जागा बदलण्यात आली, असा दावा शाम मानव यांनी केला.
 
 
 भोंदूबाबांनीच अंधश्रद्धा पसरवली
बरेच लोक मला म्हणतात, की तुम्ही हिंदूंच्या विरोधातच काम करता. मात्र आम्ही कोण्या समाजाच्या विरुद्ध काम करत नसून आम्ही समाजातील वाईट लोकांच्या विरुद्ध काम करतो. लोकांची समजूत आहे की हिंदू धर्माची प्रकरणे मी जास्त काढतो आणि हे बरोबर सुद्धा आहे.    कारण भोंदूबाबा हे हिंदू धर्मातच जास्त आहेत आणि त्यांनी जास्त प्रमाणात अंधश्रद्धा पसरवली आहे. त्यामुळे आम्हाला ते करावे लागते, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सुरेश झुरे, अंबादास खडसे, प्रकाश मगरे आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...