आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजपासून ‘बालआधार कार्ड’, नावीन्यपूर्ण योजनेचा बीडमधून प्रारंभ - पंकजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - राज्यातील सुमारे एक हजार बावन्न खासगी संस्थांमध्ये ९१ हजार पाचशे अनाथ, निराधार बालके जीवन जगत आहेत. ही बालके तसेच निराधार महिलांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्यासाठी आधार कार्ड मिळत नाही. निराधारांसाठी राज्यात बालआधार कार्ड योजना सुरू करण्यात येणार असून या नावीन्यपूर्ण योजनेचा शुक्रवारी बीडमधून प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी दिली.
राज्यात भाजप सरकार स्थापन होऊन मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांचे गुरुवारी पहिल्यांदाच जिल्ह्यात आगमन झाले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राजकीय भूमिका तसेच शासनाच्या योजनांची मािहती दिली. बालके, महिलांशी निगडित असलेले महिला व बालकल्याण खाते तेवढेच महत्त्वाचे आहे. राज्यभरात अनाथ, निराधार महिला, बालकांच्या सुरक्षिततेसाठी या खात्यामार्फत शासकीय तसेच खासगी अनुदानित संस्था आहेत. राज्यात सुमारे ९१ हजार ४५४ बालके वेगवेगळ्या एक हजार बावन्न संस्थांमध्ये वास्तव्यास आहेत. केंद्राच्या उपक्रमात राज्यात नागरिकांसाठी आधारकार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येते; परंतु निराधार, अनाथ जीवन जगणाऱ्या महिला, मुलांना आधार कार्ड मिळत नाही.
या खात्याच्या अधिका-यांची बैठक घेतल्यानंतर अडचणी तसेच विविध उपक्रमांसंदर्भात चर्चा केली. यातून या निराधारांना आधार कार्ड देण्याचा विषय पुढे आला.
बायोमेट्रिक पद्धत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून ही योजना जाहीर करण्यात आली आहे. बायोमेट्रिक पद्धतीने हे आधार कार्ड देण्यात येईल. केंद्र व राज्याचे या खात्याला मिळणारे बजेट या निराधारांच्या संख्येवरच अवलंबून असते. या योजनेचा प्रारंभ शुक्रवारी बीडमधून प्रायोगिक तत्त्वावर कार्ड देऊन करण्यात येणार असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.