आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्मितादर्श साहित्य संमेलन: भीम अॅपचे लघुरूप लोकांना भुलवण्यासाठीच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर येथे अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद‌्घाटन करताना विख्यात विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम, संमेलनाध्यक्ष डॉ. प्रज्ञा दया पवार. - Divya Marathi
लातूर येथे अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे उद‌्घाटन करताना विख्यात विधिज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम, संमेलनाध्यक्ष डॉ. प्रज्ञा दया पवार.
लातूर (प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरीतून) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकोत्तर असलेले २०१६ हे रौप्यमहोत्सवी वर्ष नुकतेच सरले. त्यानिमित्त गेल्या वर्षभरात अनेक नवीन उपक्रमांसह चर्चासत्रे, व्याख्याने झाली. केंद्र आणि राज्यसरकारनेदेखील बाबासाहेबांचे नाव घेऊन अनेक गोष्टी केल्या. त्यातल्या बव्हंशी तोंडदेखल्या, खोट्या आणि विपरीत होत्या. नुकत्याच आलेल्या भीम अॅपबद्दल आपण ऐकतोच आहोत. भारत इंटरफेस फॉर मनीचे ‘बीआयएफएम’ असे लघुरूप बनत असताना ओढून ताणून ‘भीम’ असे करणे हे लोकांना भुलवण्यासाठीच आहे, अशा शब्दांत डॉ. प्रज्ञा दया पवार यांनी सरकारवर टीका केली.  

लातुरात आयोजित ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून त्या बोलत होत्या. उद््घाटन विख्यात विधिज्ञ पद्मश्री   उज्ज्वल निकम यांच्या हस्ते झाले. या वेळी डॉ. गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जनार्दन वाघमारे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव गादेकर,  स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, प्रा. सुधीर अनवले आदींची प्रमुख उपस्थिती होती.  

दलित साहित्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि सरकारच्या धोरणांची तुलना करताना डॉ. पवार म्हणाल्या, डॉ. बाबासाहेबांनी त्यांच्या लेखनाच्या सुरुवातीला द प्राम्ब्लेम ऑफ रुपी आणि कास्ट््स इन इंडिया या दोन संहिता लिहिल्या. या दोन्हींशी संबंधित अतिशय महत्त्वपूर्ण घडामोडी २० १६ वर्षातच घडल्या. नोटबंदीचा परिणाम घराघरांत पोहोचून देशभरात मंदी आली. तीन वर्षांच्या दुष्काळानंतर यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतीची स्थिती सुधारण्याची संधी नक्कीच होती. त्यात सरकारने कृत्रिम स्वरूपाचा एक नवाच तीव्र दुष्काळ निर्माण केला. नोटबंदीमुळे गरीब, शेतकरी, मजूर, स्त्रिया आणि वंचितांचे कंबरडे मोडले. परंतु श्रीमंत, पैसे साठवून ठेवणारे लोक फारसे घाबरले नाहीत. कारण त्यांचा व्यवहार बँकांमधील रांगा कमी झाल्यानंतर खऱ्या अर्थाने सुरू झाला. जुन्या नोटांचे दर वाढू लागले. २५-३० टक्क्यांनी कोट्यवधींचे व्यवहार झाले. असे जेवढे व्यवहार पकडले गेले ते खरे तर हिमनगाचा एक सप्तमांश भाग इतकेच म्हणावे लागेल.  राज्यघटनेचे काम पूर्ण झाल्यानंतर डॉ. आंबडेकरांनी दिलेल्या ऐतिहासिक भाषणाचा उल्लेख करत पवार म्हणाल्या, बाबासाहेब म्हणाले होते की आज आपण आपल्याला राजकीय लोकशाही दिलेली आहे. पण जोवर आपण स्वतंत्र भारतात आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण करत नाही तोवर ही राजकीय लोकशाही पोकळ, कचकड्याची म्हणजेच बिनकामाची आहे. 

सध्याही आर्थिक, सामजिक क्षेत्रातील लोकशाही तर दूरच आहे, पण साध्या कल्याणकारी  धोरणांचा हस्तक्षेपही आपण काढून टाकलेला आहे. रोजगार प्रचंड वेगाने घटत आहेत. विकास कार्यक्रम आवरते घेण्यात येत आहेत.  बड्यांची कोट्यवधींची कर्जे राइट ऑफ करणाऱ्या बँका जनसामान्यांचा कष्टाचा पैसा आपल्याकडे घेऊन आता त्याचे रेशन दिल्यासारखे वाटप करत असल्याचा टोला त्यांनी लगावला.  

संविधान ग्रंथ रॅली  : येथील दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात दोनदिवसीय ३४ वे अस्मितादर्श साहित्य संमेलन पार पडत आहे.  संमेलन स्थळास प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यनगरी असे नाव देण्यात आले आहे. सकाळी टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर मुख्य रस्त्याने संमेलन स्थळापर्यंत संविधान ग्रंथ रॅली काढण्यात आली.  
 
सरते वर्ष जातींचे  
मोर्च्यांवर कटाक्ष टाकत त्या म्हणाल्या, राज्यभरात मराठा क्रांती मोर्चांचे पीक आले. प्रतिगामी व पुरोगामी खांद्याला खांदा लावून चालू लागले. एक मराठा, लाख मराठा म्हणत लाखालाखांचे नवनवे विक्रम घडवणारे मोर्चे निघू लागले व सगळ्यानांच काहीसे हबकायला झाले. पण त्यानंतर दलितांचे, ओबीसींचे आणि मुस्लिमांचेही मोर्चे निघू लागले. जातीचे मोर्चे काढणे ही आजच्या व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या काळात तशी सोपीच बाब. मोर्चाच्या अग्रभागी मुलींना पुढे केले की बाय डिफॉल्ट पुरोगामी, प्रगतिशील असल्याचे सिद्ध करता येते. मोर्चानिमित्ताने  अॅट्रॉसिटीबाबत बरीच उलटसुलट चर्चा झाली. जातीय अत्याचार मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे स्पष्ट करत त्यांनी २०१६ हे वर्ष जातींचं ठरल्याचा निर्वाळा दिला.
 
दलित-स्त्री साहित्याचे संबंध भिन्न  
दलित आणि स्त्री साहित्यावर बोलताना प्रज्ञा पवार म्हणाल्या,  या दोन्हींतील परस्परसंबंध  विभिन्न आहेत. ते कधी समांतर, तर कधी एकमेकांना छेदून जाणारे, तर कधी एकात्म वाटावे इतके भिन्न भिन्न प्रकारचे आहेत. या दोन साहित्यप्रवाहांमध्ये आपल्या वाट्याला आलेल्या दुय्यम सामाजिक स्थानासंबंधीचा रोष, नकार आणि विद्रोह दिसून येतो. त्या अर्थाने दोन्ही साहित्यपरंपरा या सामाजिकतेशी घनिष्टपणे जोडल्या गेलेल्या आहेत. तसेच दोन्हीही परांपरांमध्ये  मीपेक्षा आम्हीचा स्वर हा अधिक ठळकपणे व्यक्त झाला आहे. दोन्हीही साहित्यांच्या संदर्भात प्रस्थापित मराठी साहित्याने आधी दुर्लक्ष करण्याची, तुच्छतेची आणि तरीही ते संपत नाही असे लक्षात येताच सोयीस्कर समावेशनाची भूमिका स्वीकारल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.  
 
साहित्यातील मानवतावादी विचार जगण्यातही झिरपावे
निर्मितीची आणि घडवण्याची शक्ती साहित्यिकांमध्ये  असल्याने साहित्यकृतीतून राष्ट्राचे आत्मचरित्र निर्माण होते. साहित्यात मानवतावाद व मानवतावादी विचारही असतात, ते विचार जगण्यात झिरपले पाहिजेत, असे मत अॅड. उज्ज्वल निकम यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.  
येथे आयोजित ३४ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाच्या उद््घाटनाप्रसंगी अॅड. निकम बोलत होते. मंचावर संमेलनाध्यक्षा डॉ. प्रज्ञा दया पवार, अस्मितादर्श चळवळीचे प्रणेते डॉ. गंगाधर पानतावणे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. जनार्दन वाघमारे, स्वागताध्यक्ष जयप्रकाश दगडे, संयोजन समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. माधव गादेकर, माजी संंमेलनाध्यक्ष रवीचंद्र हडसनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.  समतेचा, न्यायाचा अभाव दूर करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयुष्यभर प्रयत्न केले. मी साहित्यिक नसलो तरी कायद्याने लढणारा मी आंबेडकरांचा शिलेदार आहे, असे नमूद करून अॅड. निकम म्हणाले की, सामाजिक स्थित्यंतरे घडत असताना कायद्यावर लोकांचा विश्वास कसा राहील हा विचार मनात नेहमीच येतो. शब्दांचा मांत्रिक म्हणजे वकील, घटनेशी प्रामाणिक राहून काम करतो. समता, बंधुता, न्यायासाठी न्यायालये स्थापन झाली आहेत. त्या न्यायालयात मी काम करतो आहे. दलित साहित्य व दलित साहित्यिक म्हणजे काय? याचे विश्लेषण करताना ते म्हणाले की, तळागळातील लोकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यातून निर्माण झालेले कसदार साहित्य म्हणजे दलित साहित्य. गौतम बुद्धांनी पूजा, उपवास यातून समाज बदलत नसतो आणि तो बदलण्यासाठी देव येणार नाही, तर लोक सुधारतील असे साहित्य निर्माण व्हावे, असे म्हटले होते, याकडे निकम यांनी लक्ष वेधले. साहित्यात मानवतावाद आहे. मानवतावादी विचारही आहेत. पण, ते प्रत्येकाच्या जीवनात झिरपले पाहिजेत, असेही ते म्हणाले.
 
..तर जवानांना वाचवता आले असते
मुंबईतील २६/११ च्या हल्ल्याचे थेट कव्हरेज पाहून कराचीतल्या कंट्रोल रूममधून हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना आर्मीच्या कारवाईची माहिती हँडल्सकडून देण्यात येत होती. ही माहिती मिळाली नसती तर भारतीय आर्मीच्या काही जवानांना वाचवता आले असते, असे सांगून पत्रकारांनी जपून पत्रकारिता करावी, असा सल्ला राज्याचे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिला. उस्मानाबाद जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने कै.अनंत भालेराव स्मृती पत्रकारिता पुरस्काराचे वितरण शनिवारी (दि. १४) जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अॅड. निकम यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.