आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमध्ये खरी लढत ‘राष्ट्रवादी’- भाजपमध्येच, उमेदवारी मिळवण्यासाठी उमेदवारांच्या काेलांटउड्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी मिळवण्यासाठी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेससह भाजप व इतर राजकीय पक्षांतील इच्छुकांमध्ये दलबदलीचे प्रकार माेठ्या प्रमाणावर सुरू अाहेत, तर दुसरीकडे, राज्यातील सत्तेच्या जाेरावर बीडची जिल्हा परिषदही अापल्या ताब्यात खेचून अाणण्यासाठी भाजपने चंग बांधला अाहे.  

राष्ट्रवादीत क्षीरसागर कुटुंबातील काका पुतण्याचा सत्ता संघर्ष, आजी- माजी आमदारांतील गटबाजी  सध्या  भाजपच्या पथ्थ्यावर पडत आहे. परळीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे विरुद्ध विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे या बहीण-भावाच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा कसाेटी लागणार अाहे. राष्ट्रवादीत घुसमट होऊ लागल्याने गेवराईचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी  पुत्र युधाजित व समर्थकांसह दोन आठवड्यांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला अाहे. गेवराई  तालुक्यातील नऊ गट व १८ पंचायत समिती गण ते शिवसेनेच्या तिकिटावर  लढवत आहेत. एेन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवारीसाठी आपल्याला डावलले जात असल्याचे पाहून  सर्वच पक्षांतील बंडखोरांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा सपाटा सुरू केला आहे.

गेवराई तालुक्यात राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य मदन आहेर यांनी भाजपात प्रवेश केला, तर  पाटोदा तालुक्यात माजी आमदार सुरेश धस समर्थक संजय नवले व अनुरथ सानप यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपात प्रवेश केला आहे. वडवणी तालुक्यातील  भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. सोमनाथ बडे हे राष्ट्रवादीत दाखल झाले.  केज तालुक्यातील विडा गटातून मुलाला तिकीट मिळत नसल्याने जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम मुंडे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन आमदार विनायक मेटेंच्या उपस्थितीत नुकताच शिवसंग्राममध्ये प्रवेश केला. बीड तालुक्यात किसान सेनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर सातपुते यांनी मंगळवारी रात्री शिवसेनेत प्रवेश केला आहे.
  
राष्ट्रवादीकडून काँग्रेसची हेटाळणी  
बीड जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होऊ शकली नाही. आता ६० गटांपैकी ३० ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होऊ नये म्हणून काँग्रेसकडून आघाडीचा प्रस्ताव होता, परंतु जिल्ह्यात काँग्रेसची फारशी ताकद नसल्याने राष्ट्रवादीने त्यांना प्रतिसाद दिला नाही.  

शिवसेना सर्वच जागा लढणार  
भाजपशी युती तुटल्याने शिवसेना पहिल्यांदाच जिल्हा परिषद निवडणुकांना सामोरे जात अाहे.  जिल्ह्यातील ६० गट व १२० पंचायत समिती गणांत सर्वच जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय पक्षाने घेतला अाहे. पाच वर्षांपूर्वी शिवसेनेकडे जिल्ह्यात केवळ दोन गट व बीड मतदारसंघात सहा पंचायत समिती गण होते. दुसरीकडे भाजपनेही ६० गटांत उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. माजलगाव तालुक्यातील सहा गटांत भाजप मोहन जगताप यांच्या जनविकास आघाडीशी हातमिळवणी करणार आहे. बीड तालुक्यात शिवसेनेशिवाय पहिल्यांदा भाजप लढत असून अामदार क्षीरसागरांचे गाव असलेल्या नवगण राजुरी गटात मात्र भाजप उमेदवार देणार नाही.
बातम्या आणखी आहेत...